लेह,
Comet Lemon in Ladakh लडाखच्या निरभ्र आणि प्रदूषणविरहित आकाशात नुकताच एक अद्भुत देखावा पाहायला मिळाला, ज्याने वैज्ञानिकांसह सामान्य नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण केला आहे. काहींना हे दृश्य पाहून क्षणभर वाटल की आकाशात ‘एलियन’ फिरतोय, तर काहीजण आश्चर्याने थक्क झाले. पण प्रत्यक्षात ते दृश्य होते एका धूमकेतूचे ज्याचे नाव आहे धूमकेतू लेमन. लडाखमधील हान्ले या जगातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या खगोलशास्त्र केंद्रातून हे विलक्षण दृश्य दिसून आले. भारतीय खगोल वेधशाळेचे प्रभारी शास्त्रज्ञ आणि प्रसिद्ध खगोल छायाचित्रकार दोर्जे अंगचुक यांनी हे अप्रतिम क्षण आपल्या कॅमेरात टिपले.

त्यांनी कैद केलेल्या छायाचित्रांमध्ये धूमकेतू लेमन आकाशगंगेच्या मागे म्हणजेच मिल्की वेच्या पार्श्वभूमीवर लकाकत जाताना स्पष्ट दिसत आहे. हा दुर्मिळ क्षण पाहून अनेकांनी सोशल मीडियावर हे व्हिडिओ आणि छायाचित्रे शेअर केली. काहींनी त्यात “एलियन स्पेसशिप” असल्याचा अंदाज बांधला, तर काहींनी चिंता व्यक्त केली. पण तज्ज्ञांनी स्पष्ट केले की तो एलियन नव्हता, तर पृथ्वीच्या जवळून जाणारा सि/2023 ए3 नावाचा धूमकेतू होता. हान्ले हे भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक सुरक्षित आणि स्वच्छ आकाश असलेले ठिकाण म्हणून ओळखले जाते. सुमारे ४,५०० मीटर उंचीवर असलेल्या या पठारी प्रदेशात रात्रीचे आकाश इतके स्वच्छ आणि निरभ्र असते की ताऱ्यांची गर्दी आणि आकाशगंगा डोळ्यांनीही स्पष्ट दिसते. याच ठिकाणाहून धूमकेतू लेमनचे हे दर्शन शक्य झाले. या धूमकेतूचे दर्शन हे खगोलशास्त्राच्या इतिहासात एक उल्लेखनीय क्षण ठरले आहे.
हा धूमकेतू प्रथम माऊंट लेमन सर्वेक्षणादरम्यान आढळला होता. आता तो पृथ्वीच्या जवळून जात असताना त्याचा प्रकाश भारताच्या उत्तरेकडील आकाशात चमकताना दिसला. हान्ले भागातील वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, येथील आकाशगंगेचं सौंदर्य आणि निरभ्रता यामुळे अशा खगोलीय घटनांचे निरीक्षण शक्य होतं. मात्र, अलीकडच्या काळात वाढत्या पर्यटनामुळे प्रकाशप्रदूषणात वाढ झाली आहे, ज्याचा परिणाम खगोल निरीक्षणांवर होत आहे. दरम्यान आभाळात चमकणारा हा धूमकेतू ‘एलियन’ नव्हे, तर विज्ञानाच्या आकाशातील अजून एक झगमगता अध्याय ठरला आहे.