कोल्हापूर,
Dr. Eknath Chitnis passes away कोल्हापूरचे सुपुत्र आणि भारतीय अंतराळ संशोधनाच्या सुवर्णयुगाचे शिल्पकार पद्मभूषण डॉ. एकनाथ वसंत चिटणीस यांचे आज (२२ ऑक्टोबर) सकाळी वयाच्या १०१ व्या वर्षी निधन झाले. विक्रम साराभाईंचे निकटचे सहकारी, इस्रोचे माजी संचालक आणि भारतातील सॅटेलाइट टीव्ही प्रयोगाचे जनक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने भारताच्या अवकाश प्रवासातील एक तेजस्वी अध्याय संपला आहे.
१९२५ मध्ये कोल्हापूर येथे जन्मलेले डॉ. चिटणीस लहानपणीच अनाथ झाले होते, परंतु आजी आणि कुटुंबीयांच्या संस्कारांनी तसेच त्यांच्या आजोबा मल्हार खंडेराव चिटणीस यांच्या “वंडर्स ऑफ स्पेस” या मराठी ग्रंथाने त्यांच्या अंतराळप्रेमाला दिशा दिली. पुणे विद्यापीठातून भौतिकशास्त्रात प्रथम श्रेणीत पदवी मिळवल्यानंतर त्यांनी ऑल इंडिया रेडिओची आकर्षक नोकरी नाकारून विज्ञानाच्या संशोधनमार्गाला प्राधान्य दिले.
१९५० मध्ये पुण्यात झालेल्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये डॉ. विक्रम साराभाईंचे भाषण ऐकल्यानंतर त्यांनी फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. कॉस्मिक किरणांवरील संशोधनासाठी त्यांनी सेरेन्कॉव्ह काउंटर तयार केला आणि पुढे एमआयटीमध्ये प्रा. ब्रुनो रॉसी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य केलं. १९६१ मध्ये विक्रम साराभाई यांनी त्यांना भारतात परत बोलावलं आणि त्यांनी देशातील पहिलं सॅटेलाइट टेलिमेट्री स्टेशन उभारलं. थुंबा रॉकेट प्रक्षेपण केंद्राची जागा निश्चित करण्यातही त्यांची मोलाची भूमिका होती. १९६३ मध्ये भारताच्या पहिल्यानायके अपाचे रॉकेटच्या यशस्वी उड्डाणाने त्यांच्या स्वप्नांना प्रत्यक्ष रूप मिळाले.
डॉ. चिटणीस यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे १९७५-७६ मधील सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट (SITE). या प्रकल्पातून नासाच्या उपग्रहाच्या साहाय्याने सहा राज्यांतील सुमारे २,४०० गावांपर्यंत शिक्षण पोहोचले. "उपग्रह म्हणजे आकाशातील शिक्षकच, असे ते म्हणायचे. या प्रयोगातूनच पुढे INSAT प्रणालीचा पाया रचला गेला आणि भारताच्या डिजिटल युगाची सुरुवात झाली. इस्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे ते संचालक राहिले. निवृत्तीनंतर त्यांनी पुणे विद्यापीठात तब्बल २५ वर्षे अध्यापन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शास्त्रज्ञांनी भारताच्या अंतराळ प्रवासाला गती दिली.
डॉ. अब्दुल कलाम यांच्या कारकिर्दीतील सुरुवातीच्या टप्प्यातही चिटणीस यांची भूमिका निर्णायक होती. १९६२ मध्ये नासा प्रशिक्षणासाठी १० भारतीय शास्त्रज्ञांची निवड होत असताना, तरुण कलाम यांचे नाव वैयक्तिकरीत्या डॉ. चिटणीस यांनी शिफारस केले होते. त्यानंतरच कलाम यांची निवड झाली आणि नासामधील प्रशिक्षणाने त्यांच्या पुढील आयुष्याचा मार्ग निश्चित केला. नंतर कलाम यांना भारताच्या पहिल्या उपग्रह प्रक्षेपण वाहनाचे प्रकल्प संचालकपद देण्यात आले, ज्यामागे डॉ. चिटणीस यांचा विश्वास आणि दूरदृष्टी होती. १९८५ मध्ये त्यांना भारत सरकारकडून पद्मभूषण सन्मान मिळाला. विशेष म्हणजे त्यांचा पुत्र डॉ. चेतन चिटणीस यांनाही यंदा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ही एक दुर्मीळ पिता-पुत्र सन्मानाची परंपरा ठरली. डॉ. एकनाथ चिटणीस यांच्या जाण्याने भारताने विज्ञानविश्वातील एक तेजस्वी दीपस्तंभ गमावला आहे. त्यांनी केवळ रॉकेट्स किंवा उपग्रह नाही, तर लाखो भारतीयांच्या स्वप्नांना अंतराळापर्यंत नेणारा विचार दिला आणि म्हणूनच ते कायमच भारतीय अंतराळ संशोधनाचे खरे शिल्पकार म्हणून ओळखले जातील.