समुद्रपूर,
farmer burns soybean crop, जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि पिकांवर आलेल्या विविध रोगांमुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला. सोयाबीनच्या शेंगाही भरल्या नसल्याने उत्पन्न सोडा खर्चही निघणार नाही, या भितीने गिरड येथील एका शेतकर्याने ९ एकरातील सोयाबीन पिकाला लक्ष्मी पुजनाच्या दिवशीच पेटवून दिले.
यावर्षी पावसाने चांगलेच थैमान घातले. जिल्ह्यात तब्बल तीन ते चार वेळा अतिवृष्टी झाली. नदी-नाल्या काठावरील शेतजमीन पिकासह वाहून गेली. अनेक शेतात चिखलाने पीक सडून गेली. पाऊस थांबल्यानंतर उर्वरित पिकांवर विविध रोगांनी आक्रमण केले. ते पीक वाचविण्यासाठी शेतकर्यांनी महागडी रासायनिक औषधांची फवारणी देखील केली. मात्र, याचा कोणताही परिणाम दिसून आला नाही. शेतकर्यांच्या डोळ्यादेखत सोयाबीन पिवळे पडू लागले. आता सवंगणी सुरू आहे. मात्र, सोयाबीनला शेंगाच भरल्या नसल्याने उत्पन्न सोडा खर्च सुद्धा निघणार नाही या भितीपोटी गिरड येथील शेतकरी राजेंद्र गिरडे यांनी लक्ष्मी पुजनाच्या दिवशीच ९ एकरातील सोयबीन पिकाला कापून स्वत:च्या हाताने आगीच्या स्वाधीन केले.
शेतकरी राजेंद्र गिरडे यांनी ९ एकरमध्ये सोयाबीनची पेरणी केली होती. सोयाबीनचे चांगले उत्पन्न व्हावे यासाठी उच्चप्रतीचे रासायनिक खत दिले. पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी त्यांनी सुरूवातीपासूनच महागड्या कीटकनाशकांची फवारणी सुद्धा केली होती. ऐन शेंगा भरण्याच्या अवस्थेत पीक पिवळे पडले आणि शेंगा भरल्या नाही. काही तरी पदरी पडेल या आशेने कापणी केली. मात्र, शेंगात दानाच नसल्याचे लक्षात येताच त्यांनी सोयाबीन पीक जमा करून स्वत:च्या हाताने पेटवून दिले. यामध्ये त्यांचे जवळपास ३ ते ४ लाख रुपयांचे नुकसान झाले असून आता सरकारकडून मिळणार्या मदतीकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.