माजी मंत्री महादेवराव शिवणकर अनंतात विलीन

22 Oct 2025 18:16:48
आमगाव/गोंदिया 
mahadevrao-shivankar-passes-away भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते माजी वित्त व पाटबंधारे मंत्री महादेवराव शिवणकर यांचे सोमवार २० ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता त्यांच्या आमगाव येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार २१ ऑक्टोबर रोजी आमगाव येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे चिरंजीव माजी जिप अध्यक्ष विजय शिवणकर व संजय शिवणकर यांनी त्यांना मुखाग्नी दिली.
 
 
mahadevrao-shivankar-passes-away
 
महाराष्ट्राच्या राजकारणात स्वकर्तृत्वाची अमिट छाप सोडणारे महादेवराव यांना लोक आदराने दादा म्हणायचे. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. त्यांनी आमगाव विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा मान मिळवला. तर चिमूर लोकसभा क्षेत्रातून खासदार म्हणून दिल्लीपर्यंत धडक मारली. शिवणकर यांच्या जन्म ४ जुलै १९४० रोजी आमगाव येथील सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण इतिहास व अर्थशास्त्र अभ्यासक्रमात एम. ए. पर्यंत झाले. त्यांचा संपर्क भवभूती शिक्षण संस्थेचे संस्थापक तथा भाजपाचे वरिष्ठ नेते श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर यांच्याशी आला. पुढे या भवभूती महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून सेवेत रुजू झाले. mahadevrao-shivankar-passes-away महादेवराव यांनी आदिवासींच्या प्रश्नासाठी आदिवासी संमेलने भरविण्यात पुढाकार घेतला. तसेच शेतकर्‍यांच्या धानाला योग्य मूल्य मिळवून देण्यासाठी अनेक परिषदा आयोजित केल्या. १९७४ च्या दुष्काळात दुष्काळग्रस्तांना कामे मिळवून देण्यासाठी चळवळ उभी केली. सन १९७४ ते ७५ या काळात आमगाव खरेदी विक्री संघाचे मानद सचिव बनले. तसेच आमगाव सेवा सहकारी संस्थेच्या कार्यकारी समितीवर कार्यरत होते.
 
आणीबाणीच्या काळात जुलै १९७५ ते जानेवारी १९७७ पर्यंत त्यांनी तुरुंगवास भोगला. त्यांचे हे कार्य बघून १९७८ मध्ये जनतेने त्यांना सर्वप्रथम महाराष्ट्र विधानसभेत आमदार म्हणून निवडून दिले. त्यानंतर १९८० ला दुसर्‍यांदा ते विधानसभेवर निवडून आले. १९८५ ला विधानसभेवर त्यांची फेरनिवड झाली. त्यावेळी लोकसेवा समितीचे प्रमुख म्हणून त्यांचे नियुक्ती झाली. १९८९ मध्ये पक्षाने त्यांना चिमूर लोकसभा क्षेत्राची तिकीट दिले. पक्षश्रेष्ठीच्या विश्वासावर खरे उतरत ते चिमूर लोकसभा क्षेत्रातून लोकसभेवर निवडून गेले. संसदेच्या पटलावरून त्यांनी शेतकर्‍यांचे प्रश्न, ग्रामीण विकासाचे मुद्दे तसेच विदर्भाच्या समस्या प्रभावीपणे मांडल्या. त्यांना राष्ट्रीय किसान आघाडीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली ती त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. १९९५ मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत ते परत निवडून आले. यावेळी त्यांना राज्याचे अर्थ व पाटबंधारे मंत्री म्हणून मोठी जबाबदारी देण्यात आली. महादेवराव यांचे व्यक्तिमत्व संघ संस्कारातून घडले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक होते. परिणामी त्यांच्यात राष्ट्रभक्ती, शिस्त व समाजसेवा याविषयी तळमळ होती. गेल्या काही वर्षांपासून ते वृद्धपकाळामुळे अस्वस्थ होते. त्यातच २० ऑक्टोबर रोजी त्यांना देवाज्ञा झाली. त्यांच्या निधनाची बातमी पसरताच गोंदियासह भंडारा जिल्ह्यातील त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
 
मंगळवारी सकाळी १० वाजता त्यांच्या निवासस्थानातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.  mahadevrao-shivankar-passes-away दुपारी १२ वाजताच्या सुमारास सालेकसा मार्गावरील मोक्षधामात त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारोच्या संख्येने नागरीकांनी हजेरी लावली होती. प्रसंगी मध्यप्रदेशचे माजीमंत्री गौरीशंकर बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा ओयोजित करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी रा.स्वं.संघाचे क्षेत्रीय बौद्धीक प्रमुख अनिल जोशी, विभाग संघचालक दलजीतसींग खालसा, बजरंग दल प्रांत संयोजक नवीन जैन, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते पाटील, खा. डॉ. प्रशांत पडोळे, जि. प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर, आ. विनोद अग्रवाल, आ. संजय पुराम, मध्यप्रदेशचे आ. राजकुमार कराहे, माजी खा. सुनील मेंढे, माजी खा. डॉ. खुशाल बोपचे, माजी खा. मधुकर कुकडे, माजी आ. हेमकृष्ण कापगते, माजी आ. मनोहर चंद्रिकापूरे, माजी आ. खोमेश्वर रहांगडाले, माजी आ. भजनदास वैद्य, माजी आ. भैरसींग नागपूरे, माजी आ. सेवक वाघाये पाटील, गोंदियाचे माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे आदी सर्वच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते हजारोच्या संख्येत उपस्थित होते. शोकसभेचे संचालन रा.स्वं. संघाचे प्रांत सहसेवा प्रमुख प्रा. उमेश मेंढे यांनी केले.
 
Powered By Sangraha 9.0