तभा वृत्तसेवा
घाटंजी,
Ghatanji youth chaos शहरात सर्वत्र महालक्ष्मी पूजनाची धावपळ सुरू असताना घाटंजी येथील टवाळखोर तरुणांचा शहरातील पंजाबी हॉटेल समोरील बायपासवर अक्षरक्ष: धिंगाणा सुरू होता. दोन गट तयार करून रॉकेट आणि सुतळीबाँब फोडून या तरुणांनी दहशत निर्माण केली होती.मंगळवार, 21 ऑक्टोबर रोजी रात्री 30 ते 40 युवकांनी एकत्र येऊन बायपासवर फटाके फोडून धुमाकूळ घातला होता. या टोळीच्या धुडगुसाचा सर्वात जास्त परिणाम दुचाकीस्वारांना झेलावा लागला. दुचाकीस्वारांवर फटाके फेकण्यापर्यंत या युवकांची मजल गेली होती.
वाहनचालकांना Ghatanji youth chaos ‘टार्गेट’ करणे हाच या युवकांचा मस्तीचा विषय असल्याचे काही वेळातच नागरिकांच्या लक्षात आले. या बायपासला लागूनच नागरी वसाहती असल्यामुळे तेथील नागरिकसुद्धा दहशतीत आले होते. या युवकांच्या फटाके फोडत ओरडण्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.यातील काही युवक पोलिसांच्या गतीविधीवर लक्ष ठेवून होते. पोलिसांचे वाहन दिसताच एका एका दुचाकीवर बसून चार चार युवकांनी धूम ठोकली. त्यामुळे कारवाईसाठी आलेल्या पोलिसांच्या हाती कोणीच लागले नाही. पोलिसांची पाठ फिरताच पुन्हा त्या ठिकाणी युवकांची जमवाजमव सुरू झाली होती.शहरातील मुख्य मार्गावर अशी घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यतत्परतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या टवाळखोर युवकांनी केवळ कायद्याचे उल्लंघनच केले नाही तर थेट पोलिसांना आव्हानच दिल्याचे दिसून येत होते.
शहरातील या तरुणांचा ‘असा’ धिंगाणा पाहून अरे यांना कोण आवरणार.., असा प्रश्न शहरातील सुज्ञ नागरिक विचारत आहेत. यावर वेळीच लक्ष दिले नाही तर याची मोठी किंमत समाजाला मोजावी लागू शकते, अशी भावना काही ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.