देवळी,
rohan deshmukh murder तालुयात अवैध वाळू व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला असून वाळू उचल घाटाच्या सीमा वादातून तस्करांमध्ये वाद होऊन रवींद्र पारिसे (५०) रा. अंदोरी (आंजी) या अवैध वाळू उत्खनन व दारू विक्रेत्याचा आंजी (अंदोरी) येथील वाळू तस्कर रोहन देशमुखने सहकार्यांच्या मदतीने चाकूने भोसकून खून केला. ही घटना अंदोरी येथून २ किमी अंतरावर असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील ए. बी. बार येथे २० रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, देवळी तालुयातील वर्धा नदीवरील आंजी, अंदोरी, शिरपूर, खर्डा, बोपापूर, रोहिणी, तांबा, कविटगाव, गुंजखेडा व इतर गावांच्या नदी घाटावरून मोठ्या प्रमाणात वाळूचे अवैध उत्खनन करून तस्करी केली जाते. ज्या घाटावर वाळू तस्करांचा ताबा असून ते इतरांना आपल्या घाटावरून उत्खनन करू देत नाही. अनधिकृत ताबा असलेल्या वाळू घाटावरील तस्कराच्या घाटावरून वाळूची उचल केल्यास ते परस्परावर हल्ले करतात. असाच प्रकार वाळू तस्कर रवींद्र पारिसे व आंजी घाटाचा तस्कर रोहन देशमुख व त्याच्या सहकार्यांमध्ये घडला. यांच्यात वाळू घाटाच्या सिमांचा वाद सुरू होता. रवींद्र पारिसे यांचा काटा काढण्यासाठी रोहन देशमुख याने रवींद्र पारिसे याला ए. बी. बार येथे बोलविले. या बारमध्ये वाद करून रोहन देशमुख, त्याचे सहकारी पंकज जबडे, सुनील तेलरांधे, तुषार रघाटाटे उर्फ बाटा, योगेश बोटफोले यांनी चाकू, दगड, ब्लेडच्या सहाय्याने रवींद्र पारिसेचा खून केला. खून करून हे पाचही जण फरार झाले आहे,अशी मागणी कळंब पोलिसांनी दिली.
रवींद्र पारिसे हा वाळू तस्कर असला तरी तो सामाजिक कार्यकर्ता व गरजूंना मदत करणारा असल्याने त्याच्याप्रती गावामध्ये सहानुभूती होती. ऐन दिवाळीच्या दिवशी सायंकाळी त्यांच्यावर वर्धा नदीच्या तिरावर अन्त्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची कळंब पोलिसात तक्रार दाखल करण्या आली. पुढील तपास कळंबचे ठाणेदार करीत आहे.
एलसीबीने केले दोघांना अटक
या प्रकरणातील आरोपी वर्धा जिल्ह्यात फिरत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनात वर्धा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पंकज जबडे रा. देवळी व सुनील तेलरांधे रा. देवळी या दोघांना २२ रोजी ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी यवतमाळ जिल्ह्याच्या कळंब पोलिसांच्या स्वाधीन केले.