शक्तिशाली हवाई दल जगात 'तिसऱ्या क्रमांकावर'

22 Oct 2025 15:20:06
नवी दिल्ली
WDMMA भारतीय हवाई दलाने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी झेप घेतली असून, वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्ट (WDMMA) संस्थेच्या ताज्या अहवालानुसार भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात शक्तिशाली हवाई दल ठरले आहे. या यादीत चीनला मागे टाकून भारताने तिसरे स्थान मिळवले असून, अमेरिका आणि रशिया अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान कायम राखून आहेत.
 

WDMMA  
 
 
WDMMA ही संस्था दरवर्षी जगभरातील हवाई दलांची स्थिती आणि कार्यक्षमता यावर आधारित अहवाल जाहीर करते. या क्रमवारीसाठी १०३ देशांतील एकूण १२९ सैनिकी हवाई दलांचा अभ्यास करण्यात आला असून, ४८ हजारांहून अधिक लष्करी विमानांचा समावेश त्यात होता. भारताची TruVal Rating (TVR) ६९.४ इतकी असून, चीनची रेटिंग ६३.८ नोंदवली गेली आहे. भारत याआधी चौथ्या स्थानावर होता, तर चीन तिसऱ्या स्थानी होता.
 
 
या क्रमवारीत WDMMA  केवळ विमानांची संख्या नाही, तर त्यांची कार्यक्षमता, आक्रमण व संरक्षण क्षमता, आधुनिकीकरणाचा स्तर, पायलट्सचं प्रशिक्षण, देखभाल यंत्रणा आणि लॉजिस्टिक आधार आदी घटक विचारात घेतले जातात. TruVal Rating ही एक संपूर्ण युद्धक्षमतेचं मूल्यांकन दर्शवते, ज्यामुळे संख्येपेक्षा गुणवत्ता अधिक महत्त्वाची ठरते.
सध्या भारतीय हवाई दलाकडे एकूण १,७१६ लष्करी विमाने आहेत. यामध्ये राफेल, सुखोई-३०MKI यांसारख्या अत्याधुनिक फायटर जेट्ससोबतच, मालवाहू विमानं, हेलिकॉप्टर्स, ड्रोन, ट्रेनर एअरक्राफ्ट्स आणि टेहळणी विमानांचा समावेश आहे. याशिवाय भारताने अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि इस्रायल यांसारख्या तंत्रज्ञानप्रधान देशांतील यंत्रणांचा प्रभावी वापर करत आपल्या हवाई दलाला आधुनिकतेच्या शिखरावर पोहोचवलं आहे.भारताने मागील काही वर्षांमध्ये आपल्या हवाई दलाच्या रणनैतिक क्षमतेत मोठ्या प्रमाणावर सुधारणा केल्या आहेत. विशेषतः मे २०२५ मध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय हवाई दलाने अचूक हल्ले करत ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईत पाकिस्तानचे डझनभर रडार स्टेशन आणि लष्करी हवाई तळ निष्क्रिय करण्यात आले, ज्यामुळे भारताची आक्रमक आणि अचूक कारवाई करण्याची क्षमता जागतिक स्तरावर अधोरेखित झाली.
 
 
 
या यशामुळे WDMMA  चीनची चांगलीच कोंडी झाली असून, त्यांनी आपल्या सरकारी मुखपत्र ग्लोबल टाइम्स मधून रँकिंगवर नाराजी व्यक्त केली आहे. "कागदावरील आकडे नव्हे, तर रणांगणावर सिद्ध होणारी खरी क्षमता महत्त्वाची असते," असं म्हणत चिनी लष्करी विश्लेषक Zhang Junshe यांनी या रँकिंगवर टीका केली आहे. मात्र, अलीकडील लष्करी कारवायांमधून भारताने प्रत्यक्ष कृतीतून आपली ताकद दाखवून दिली आहे, हे जगाने पाहिले आहे.
दरम्यान, अमेरिकन WDMMA  हवाई दलाने यंदाही २४२.९ TVR रेटिंगसह आपलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. त्यांच्या ताफ्यात स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स, मल्टीरोल फायटर जेट्स, ट्रान्सपोर्ट विमानं, टँकर आणि स्पेशल मिशन एअरक्राफ्ट्सचा समावेश आहे. रशियन हवाई दल दुसऱ्या स्थानी असून त्यांची रेटिंग १४२.४ आहे.भारतीय हवाई दलाने केवळ तांत्रिक प्रगतीच नव्हे, तर युद्ध रणनिती, प्रशिक्षण, देखभाल यंत्रणा आणि ऑपरेशनल तत्परतेच्या बाबतीत भक्कम पाऊल उचलले आहे. या प्रगतीमुळे केवळ भारताची लष्करी क्षमता नव्हे, तर आंतरराष्ट्रीय सामरिक संतुलनातही लक्षणीय बदल झाला आहे.भारतीय हवाई दलाची ही झेप केवळ सध्याच्या स्थितीवरच नव्हे, तर भविष्यातील सामरिक उद्दिष्टांवरही दूरगामी परिणाम करणारी ठरणार आहे. आशिया खंडातील सामरिक स्पर्धेत भारताने घेतलेली ही आघाडी भविष्यात आणखी बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0