मुंबई,
raja shivaji set accident, अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुखच्या आगामी राजा शिवाजी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एप्रिल 2025 मध्ये घडलेल्या दुःखद दुर्घटनेनंतर, दिवाळीच्या सणासुदीत त्याने दिलेलं वचन पाळत आपली माणुसकी सिद्ध केली आहे. या चित्रपटात काम करणाऱ्या सौरभ शर्मा या ज्युनिअर आर्टिस्ट आणि डान्सरचा नदीत बुडून मृत्यू झाला होता. आता रितेशने सौरभच्या कुटुंबीयांना 15 लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे.
सौरभ शर्मा हा मूळचा राजस्थानमधील जोधपूरचा रहिवासी होता. फिल्म इंडस्ट्रीत आपलं करिअर घडवण्यासाठी तो मुंबईत आला होता. एप्रिल महिन्यात साताऱ्याजवळील संगम माहुली परिसरात ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना, एका गाण्याच्या चित्रीकरणानंतर कलाकार आणि डान्सर्सच्या समूहाने अंघोळीसाठी जवळच्या नदीत प्रवेश केला. त्याचवेळी सौरभ नदीच्या खोल भागात गेला आणि भोवऱ्याच्या प्रवाहात सापडून बुडाला. दोन दिवस चाललेल्या शोधमोहीमेनंतर त्याचा मृतदेह सापडला होता.
या घटनेनंतर संपूर्ण चित्रपट युनिट हादरून गेले होते. अभिनेता रितेश देशमुख, निर्माती जिनिलिया देशमुख आणि नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. रितेशने साताऱ्याचे जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधत शोधकार्य वेगात सुरू ठेवण्याचं आवाहन केलं होतं.
घटनेनंतर रितेशने सौरभच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं होतं. हे आश्वासन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पूर्ण करण्यात आलं. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजचे जनरल सेक्रेटरी अशोक दुबे यांनी यासंदर्भात माहिती दिली. “इन्शुरन्स क्लेममधून मिळालेली रक्कम, म्हणजे 15 लाख रुपये, रितेशने सौरभच्या आईच्या खात्यात थेट ट्रान्सफर केली. रितेशच्या या कृतीतून त्याची संवेदनशीलता आणि माणुसकी दिसून येते,” असं दुबे यांनी म्हटलं.
दुबे यांनी या प्रसंगी चित्रपटसृष्टीतील इतर कलाकारांनाही अशा प्रकारच्या प्रसंगी जबाबदारीची जाणीव ठेवण्याचं आवाहन केलं. “फक्त चित्रपटात नाही, तर प्रत्यक्ष जीवनातही हिरो कसा असावा, याचं उदाहरण रितेशने दिलं आहे,” असं ते म्हणाले.‘राजा शिवाजी’हा रितेश देशमुख दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपट असून, मराठा साम्राज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान घडलेली ही दुर्घटना दु:खद ठरली असली, तरी रितेशच्या संवेदनशील आणि तत्पर निर्णयामुळे सौरभच्या कुटुंबाला थोडासा दिलासा मिळाला आहे.चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी आणि कामगार संघटनांनी रितेशच्या या पावलाचं कौतुक केलं असून, ‘माणूस म्हणून मोठं असणं’ हीच खरी लोकप्रियतेची ओळख असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.