गौतम गंभीर यांना 'खान' चालत नाही

22 Oct 2025 16:08:34
नवी दिल्ली
shama mohammed statement भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीवरून पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे. मुंबईचा युवा फलंदाज सरफराज खान याची सातत्याने संघातून होणारी उपेक्षा आणि त्यावरून काँग्रेस प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांनी उपस्थित केलेला सवाल आता चर्चेचा विषय ठरला आहे. सरफराज खानला संघात संधी न देण्यामागे त्याचं ‘आडनाव’ कारणीभूत आहे का, असा सवाल करत त्यांनी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर निशाणा साधला आहे.
 
 

shama mohammed statement 
शमा मोहम्मद यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (माजी ट्विटर) वरून एक पोस्ट करत सरफराजच्या वगळण्यावर नाराजी व्यक्त केली. “सरफराज खानला त्याच्या आडनावामुळे निवडण्यात येत नाही का? मी फक्त प्रश्न विचारतेय. आम्हाला माहितीय, गौतम गंभीर या संदर्भात काय विचार करतात,” असं त्या म्हणाल्या. त्यांच्या या विधानामुळे राजकीय आणि क्रीडा वर्तुळात खळबळ उडाली असून, सोशल मीडियावर समर्थन आणि टीकेच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
 
 
 
सरफराज खानने shama mohammed statement  देशांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आपली दावेदारी सिद्ध केलेली आहे. त्याची प्रथमश्रेणी क्रिकेटमधील सरासरी ६५ पेक्षा अधिक आहे आणि त्याने अनेक निर्णायक डाव खेळले आहेत. तरीही त्याला सातत्याने कसोटी संघाच्या बाहेर ठेवण्यात येत असल्याने चाहत्यांत आणि क्रिकेट जाणकारांमध्ये नाराजी आहे. विशेषतः न्यूझीलंडविरुद्धची घरगुती कसोटी मालिका खेळल्यानंतर त्याला ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्याच्या संघात स्थान देण्यात आलेले नाही. 'इंडिया ए' संघासाठी देखील त्याच्या नावाचा विचार झालेला नाही.दरम्यान, एका माजी राष्ट्रीय निवडकर्त्याने पीटीआयशी बोलताना सांगितलं की, सरफराजला पुढे यायचं असेल, तर त्याने आपल्या फलंदाजीच्या क्रमांकावर लक्ष केंद्रित करावं. त्यांनी सुचवलं की, सरफराजने मुंबई संघ व्यवस्थापनाशी बोलून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा प्रयत्न करावा. कारण पाचव्या आणि सहाव्या क्रमांकासाठी संघाकडे अनेक ऑलराउंडर पर्याय आहेत. “पंत, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश रेड्डी यांसारखे खेळाडू फिट असतील, तर मधल्या फळीत त्यांच्या आधी संधी मिळू शकते,” असं त्यांनी स्पष्ट केलं. याशिवाय, न्यूझीलंडविरुद्ध चार अपयशी डावांनंतर त्याच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित झाल्याचंही त्यांनी नमूद केलं.
 
 
शमा मोहम्मद यांचं हे पहिलं वादग्रस्त विधान नाही. यापूर्वी रमजान महिन्यात मोहम्मद शमीने आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर एनर्जी ड्रिंक घेतल्याच्या प्रकरणातही त्यांनी शमीचं समर्थन केलं होतं. “इस्लाममध्ये प्रवासादरम्यान रोजा ठेवणं अनिवार्य नाही,” असं म्हणत त्यांनी शमीवर टीका करणाऱ्या धार्मिक नेत्यांना फटकारलं होतं.सरफराज खानच्या वगळण्याचा मुद्दा आता केवळ क्रिकेटपुरता मर्यादित राहिलेला नसून, तो सामाजिक आणि राजकीय वादाचं स्वरूप घेत आहे. निवड प्रक्रियेतील पारदर्शकता, कौशल्याच्या आधारे संधी मिळणं आणि कोणत्याही प्रकारच्या भेदभावापासून मुक्त असलेली संघ रचना या मुद्द्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड किंवा निवड समितीकडून यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, शमा मोहम्मद यांच्या विधानामुळे वाद पेटण्याची शक्यता असून, सरफराज खानच्या भविष्यातील संधींवर त्याचा परिणाम होईल का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे.
Powered By Sangraha 9.0