वर्धा,
UCN office fire Wardha शहरातील बॅचलर मार्गावरील यूसीएन नेटवर्कच्या कार्यालयात दिवाळीच्या दिवशी आग लागली. या आगीत पूर्ण युनिट जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. ही घटना मंगळवार २१ रोजी रात्री घडली.
युसीएन नेटवर्कचे कार्यालय शहरातील बॅचलर मार्गावरील जुन्या लोकविद्यालय समोर असलेल्या अपार्टमेंटमध्ये आहे. जिथून शहरात इंटरनेट सेवा पुरवली जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वत्र फटायांची आतषबाजी सुरू असताना रात्री ९ वाजताच्या सुमारास कार्यालयातून धूर निघत असल्याचे काहींच्या निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वर्धा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी अग्निशमन बंबासह घटनास्थळ गाठले. आगीवर पाण्याचा मारा करून दीड तासानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीत विविध साहित्य जळून राख झाल्याने मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे परिसरातील इंटरनेट सेवा काही काळासाठी प्रभावित झाली होती. फटायामुळे ही आग लागल्याचे बोलले जात आहे. या घटनेची नोंद रामनगर पोलिसांनी घेतली आहे.