तभा वृत्तसेवा
उमरखेड,
Umarkhed accident नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील संगम चिंचोली फाट्याजवळ मंगळवार, 21 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात राणी प्रतीक कांबळे (वय 24, उटी, ता. महागाव) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे पती प्रतीक दत्ता कांबळे (वय 30) आणि दोन मुले ऋतुराज (वय 3) व 6 महिन्यांचा चिमुरडा आरुष हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॅनियल डेव्हिडसन ख्रिस्तोफर वेलपुकोंडा (वय 20, कैलासनगर, नांदेड) हा तरुण आपल्या ताब्यातील कार भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवत होता. त्याने समोरून येणाèया प्रतीक कांबळे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत राणी कांबळे यांचा घटनास्थळीच करुण अंत झाला.
कांबळे दाम्पत्यासह दोन्ही मुले माहेर उचाडा (ता. हदगाव) येथून सासरी उटी (ता. महागाव) येथे जात असताना हा अपघात घडला. अपघातानंतर तत्काळ जखमींना विष्णुपुरी रुग्णालयात प्रथमोपचारासाठी नेण्यात आले व पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय नांदेड येथे हलविण्यात आले.या प्रकरणी सोपान शेषराव शेळके यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला असून कार व मोटारसायकल दोन्ही वाहने ताब्यात घेतली आहेत. या दुर्दैवी अपघाताने परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनास्थळी सहपोलिस निरीक्षक विनायक रामोड, उपनिरीक्षक गणेश मुंडे, अमर खिल्लारे, सहपोलिस उपनिरीक्षक मधुकर जाधव व विष्णू राठोड यांनी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार गजानन पोळे करीत आहेत.