..वेध..
नंदकिशोर काथवटे
investment गेल्या काही वर्षांत शेअर बाजारात गुंतवणुकीचा एक अनोखा उन्माद पाहायला मिळतो आहे. विशेषतः कोरोना काळानंतर लाखो लोकांनी या बाजाराकडे धाव घेतली. मोबाईलवर दोन क्लिकमध्ये खाते उघडून काही सेकंदात शेअर्स विकत घेणं आज सोपं झालं आहे. सोशल मीडियावर दररोज कुणीतरी सांगतो, अमुक शेअरने इतके रिटर्न दिले आणि मग लोक त्या शेअरच्या मागे धावत सुटतात. पण या धावपळीचा शेवट नेहमी नफ्यातच होतो का? शेअर बाजार म्हणजे केवळ पैसे टाकण्याचं ठिकाण नाही, तर ती एक अभ्यासाची आणि समजुतीची गोष्ट आहे. पण सध्या अनेक गुंतवणूकदार - विशेषतः तरुण वर्ग - कोणतीही पृष्ठभूमी न पाहता फक्त ऐकीव माहितीवर निर्णय घेत आहेत. कुणीतरी सांगितलं, हा शेअर झपाट्याने वाढतो आहे, एवढं ऐकलं आणि लगेच गुंतवणूक केली. त्या कंपनीचा व्यवसाय काय आहे, तिचा नफा, तिचं भविष्य याचा अभ्यास मात्र कोणीच करत नाही. गेल्या दशकात भारतीय शेअर बाजाराने सरासरी 12 ते 14 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. काही निवडक कंपन्यांनी मोठा नफा दिला, पण अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांचे पैसे बुडवले. तरीही लोकांच्या लक्षात फक्त त्या काही यशस्वी उदाहरणांचाच गाजावाजा राहतो. रिलायन्स वाढला, इन्फोसिस वाढली, हे ऐकून सर्व जण नशीब आजमावू लागतात. आज ‘म्युच्युअल फंड सही है ’ हे वाक्य घराघरात पोहोचलं आहे.
पण त्या जाहिरातीतच सांगितलेलं ‘सब्जेक्ट टू मार्केट रिस्क’ हे वाक्य लोकांच्या लक्षातच राहत नाही. कारण नफा मिळवण्याचं आकर्षण इतकं जबरदस्त असतं की जोखमीकडे कोणी पाहतच नाही. हीच खरी धोक्याची घंटा आहे. तरुण वर्गाला वाटतं की शेअर बाजार म्हणजे लवकर श्रीमंत होण्याचा सोपा मार्ग आहे. काही दिवसांत पैसे दुप्पट होतील, अशी स्वप्नं दाखवली जातात. पण बाजार हे स्वप्न नव्हे, ती वास्तवाची कठोर परीक्षा आहे. चढ-उतार, अफवा, जागतिक घडामोडी, व्याजदर, राजकीय स्थिरता - या सगळ्यांचा परिणाम शेअरच्या किमतीवर होतो. आणि हे समजून घेणं प्रत्येकासाठी शक्य नसतं. आज अनेक जण नोकरी किंवा व्यवसायाबरोबर ‘ट्रेडिंग’ करतात. काहींना नफा होतो, पण बरेच जण नुकसान लपवतात. सोशल मीडियावर फक्त यशस्वी स्क्रीनशॉट दाखवले जातात; नुकसान झाल्याचं कोणी उघड बोलत नाही. त्यामुळे इतरांना वाटतं, सगळेच कमावत आहेत, आपणही करावं. अशा मानसिकतेतून सुरू झालेली गुंतवणूक ही भावनेवर आधारित असते, तर्कावर नव्हे. शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी संयम, विवेक आणि ज्ञान या तिन्ही गोष्टी आवश्यक आहेत. आज अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांनी एफडी, पीएफ, विमा योजना सोडून थेट शेअर बाजारात उडी घेतली आहे. त्यांना वाटतं की बाजारात पैसे पटकन वाढतात. पण बाजार खाली गेल्यास त्याच पैशांचं मूल्य किती पटकन घटतं, हे त्यांनी पाहिलं नाही. 2008, 2020 या काळातील बाजार कोसळण्याची उदाहरणं अजून ताजी आहेत. भविष्यात अशीच परिस्थिती निर्माण झाली, तर सर्वांत मोठा फटका मध्यमवर्गीयांनाच बसेल. कारण त्यांची बचत मर्यादित असते. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या जोखीम सहन करण्याची क्षमता ओळखून गुंतवणूक करावी. आर्थिक सल्ला हवा असेल, तर अधिकृत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.investment शेअर बाजारात गुंतवणूक चुकीची नाही, पण डोळे झाकून गुंतवणूक धोकादायक आहे. ज्ञानाशिवाय गुंतवणूक म्हणजे आंधळ्या पावलांनी चालण्यासारखी कुठे गाठ लागेल, हे माहीत नसतं. आज सोशल मीडियावर ‘शेअर गुरू’ नावाने शेकडो लोक सल्ले देतात. या शेअरमध्ये गुंतवा, उद्या श्रीमंत व्हाल! असं सांगणाऱ्यांवर आंधळा विश्वास ठेवून हजारो लोक आपली बचत जोखमीवर ठेवतात. पण नफा दाखवणाऱ्यांइतकेच नुकसान झालेल्यांचे आवाज मात्र कुठेच ऐकू येत नाहीत. आज सरकार, बँका, वित्त संस्था आणि दलाल सगळे गुंतवणुकीचे महत्त्व सांगतात. पण कुणीही जोखमीबद्दल स्पष्ट बोलत नाही. म्युच्युअल फंड, शेअर्स, क्रिप्टो या सगळ्या गोष्टी आकर्षक वाटतात कारण त्यात ‘कमी वेळात जास्त पैसा’ मिळण्याची मानसिकता काम करते. पण सत्य हे आहे की गुंतवणुकीचा सुवर्णमध्य म्हणजे ज्ञान, संयम आणि विवेक. तरुण पिढीने या मोहातून बाहेर पडून वास्तवाकडे पाहायला हवं. श्रीमंतीचा शॉर्टकट नसतो; ती शिस्त, अभ्यास आणि संयमानेच मिळते. आणि म्हणून पुढच्या वेळी कुणी सांगेल हा शेअर दुप्पट होणार! तेव्हा थांबा, आणि स्वत:ला एक प्रश्न विचारा कसावरून?
9922999588