वेध...
illegal businesses कायद्याचा अमल शरीरावर चालतो, मनावर चालू शकत नाही. मग वाईट मार्गाने लागलेल्या व्यक्तींबद्दल करायचे काय? त्यांना तसेच सोडून द्यायचे की, त्यांच्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न करायचे, हाच विषय आता ऐरणीवर आला आहे. नागपूर जिल्ह्याचा विचार करता बहुतांश भागांत अवैध धंदे वायुवेगाने वाढत आहेत. विशेषत: मोहफुलापासून दारू तयार करणाèया प्रकारात महिलांचा सहभाग वाढला आहे. पूर्वी या क्षेत्राकडे महिला भटकतही नव्हत्या. मग आता त्यांची एवढी सक्रियता का वाढली, यावर संशोधन करायला हवे. तसे पाहता महाराष्ट्र शासनाची नक्षलवाद्यांसंदर्भात आत्मसमर्पणाची योजना आहे. अगदी त्याच धर्तीवर अवैध धंदे चालविणाऱ्यांच्या संदर्भातही एखादी चांगली योजना आता अंमलात यायला हवी. शेवटी सुव्यवस्थेतूनच अवैध धंदे संपुष्टात येतील, असा माझा ठाम विश्वास आहे.
सुव्यवस्था म्हणजे प्रत्येकाला समन्यायी भूमिकेतून पाहणारी व्यवस्था. नागपूर जिल्ह्यात पोलिसांनी आक्रमक भूमिका स्वीकारून दारू अड्ड्यांवर ड्रोनद्वारे निगराणी सुरू केली आहे. पूर्वी पोलिस अशा अड्ड्यांवर खबरीलालमार्फत नजर ठेवायचे अन् त्यांना दोन-चारशे रुपये देत पक्की खबर घ्यायचे. त्यात तथ्य आढळल्यास तातडीने कारवाई करायचे. पण पोलिसांच्या हाती फारसे काही लागत नव्हते. कारण कुणकुण लागल्यास अवैध धंदेवाले सर्व माल जमिनीत गाडून ठेवायचे. पोलिसांना जमिनीत गाडलेला माल काही केल्या दिसत नव्हता. ते यायचे आणि रिकाम्या हाताने परतायचे. ड्रोनद्वारे पोलिसांना खूप काही घबाड दिसू लागले आहे. आता गुन्हेगारांची अवस्था सळो की पळो झाली आहे. मात्र अवैध धंदे बंद झाल्यावर गुन्हेगारांसह त्यांच्या कुटुंबीयांची गुजराण नेमकी होणार कशी? कालपर्यंत अवैध दारू विकून रग्गड पैसा मिळविणारे रातोरात वाल्मीकिप्रमाणे वागतील काय, याचे उत्तर ‘नाही’ असेच द्यावे लागेल. कारण कुठलेही परिवर्तन सहजासहजी होत नसते. याकरिता पहिल्यांदा तसा पाया मजबूत करावा लागतो. हा पाया मजबूत करण्याचे कार्य पोलिसांसह समाजाने करायला हवे. आमच्या गावातील अवैध धंदे बंद करा, अशी मागणी करणाऱ्यांनी, ते सुरूच कसे झाले, यावर आत्मचिंतन करायला हवे. आपल्या ताटात अमृत आणि विष ठेवलेले असते. त्यातील अमृत निवडायचे की विष यासंदर्भात सदसद्विवेकबुद्धी आपल्याकडे नसेल तर त्याचा दोष इतरांना का म्हणून द्यायचा, यावर समाजाने चिंतन करायला नको का? केवळ पोलिसांना दोष देत आपण नामानिराळे राहण्याचा प्रकार आता थांबलाच पाहिजे. सज्जनांना त्रास दिल्यास ते दुर्जनतेकडे वळतात. मग त्याच दुर्जनांचा अतिरेक वाढल्यावर त्यांना सन्मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करायचा हे दुष्टचक्र थांबले पाहिजे. दारू पोटासाठी कर्दनकाळ आहे. म्हणूनच की काय सरकारी खात्यामार्फत ‘संसार उद्ध्वस्त करी दारू, दारूस स्पर्श नका करू’ अशी जनजागृती केली जाते. मग नवसागर आणि इतर मेंदूला मुंग्या आणणारे विष टाकलेली अवैध दारूची महिमा तर विचारूच नका.illegal businesses तरीही तिचे शौकीन समाजात वाढत आहेत. याचेही कारण शोधायला हवे. माणूस जेव्हा कंटाळतो, हतबल होतो किंवा त्याला कुठलाही मार्ग दिसत नाही तेव्हा तो आत्महत्येकडे वळतो अन् विषाचा प्याला गळ्यात ओतून जीवनाला रामराम ठोकतो. नशेखोरांचेही तसेच असावे, म्हणूनच आता समन्यायी भूमिका घेणारी सुव्यवस्था अमलात यावी अन् संपूर्ण महाराष्ट्रातील अवैध धंदेच संपुष्टात यावे, असाच रामबाण उपाय करण्याची वेळ आलेली आहे.
एखादा रस्ता पूर्णत: मोकळा असतो. हळूच तिथे एखादा टपरी टाकून अतिक्रमण करतो. त्या टपरीवर समाजातील लोक जाऊन गप्पागोष्टीत रममाण होतात. पुढे रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढते अन् गप्पागोष्टी करणारेच भविष्यात तक्रारकर्ते बनतात. आता जेव्हा पहिली टपरी टाकली तेव्हाच ते विरोध का करीत नाहीत, तेव्हाच त्यांनी मूकसंमती का दिलेली असते, यावरही मंथन व्हायला नको का? अवैध धंद्यांचेही तसेच असल्याने प्रत्येक गावातील गावकऱ्यांनी आपले गाव स्वच्छ, सुंदर आणि अवैध धंदे मुक्त कसे राहील, यावर भर द्यायला हवा. जेव्हा गावकरी जागरूक राहतील, तेव्हा अवैध धंदा सुरू करण्याचे स्वप्नही गावातील दुर्जन माणूस करणार नाही.
अनिल फेकरीकर
9822468660