हैदराबाद,
kerala football match भारतीय फुटबॉलप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनने (AFA) नोव्हेंबर महिन्याचे वेळापत्रक जाहीर करताना केरळमधील नियोजित सामना वगळला आहे. या घोषणेनंतर केरळमध्ये होणारा अर्जेंटिना आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मैत्रीपूर्ण सामना रद्द झाल्याचे स्पष्ट झाले असून, चाहत्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे.
अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनच्या नव्या वेळापत्रकानुसार, नोव्हेंबर महिन्यात संघ सर्वप्रथम स्पेनमध्ये सराव शिबिर घेणार आहे. त्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी अंगोलाची राजधानी लुआंडा येथे एकमेव फ्रेंडली सामना खेळला जाणार आहे. या सामन्यानंतर संघ पुन्हा स्पेनला परत जाईल आणि १८ नोव्हेंबरपर्यंत सराव सत्र सुरू ठेवेल. फिफाने १८ नोव्हेंबरपर्यंत मैत्रीपूर्ण सामन्यांची अधिकृत विंडो खुली ठेवली आहे.दरम्यान, ऑस्ट्रेलिया फुटबॉल असोसिएशननेही आपले नोव्हेंबरचे वेळापत्रक प्रसिद्ध केले असून, त्यानुसार ऑस्ट्रेलिया संघ अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. १४ नोव्हेंबरला वेनेझुएलाविरुद्ध आणि १८ नोव्हेंबरला कोलंबियाविरुद्ध त्यांचे सामने नियोजित आहेत. यावरून आता हे जवळपास निश्चित झाले आहे की लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिना संघ या वर्षी केरळमध्ये येणार नाही.
अर्जेंटिना kerala football match फुटबॉल असोसिएशनने याआधी २३ ऑगस्ट रोजी अधिकृत निवेदन जारी करत नोव्हेंबर महिन्यात कोची येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैत्रीपूर्ण सामना खेळणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु, आता त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या अद्ययावत वेळापत्रकात केरळचा उल्लेखच नाही. त्यामुळे सामना रद्द झाल्याची पुष्टी मिळत आहे.
या सामन्यासाठी केरळमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून जोरदार तयारी सुरू होती. कोचीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये हा उच्चप्रोफाइल सामना होणार होता. त्यामुळे मैदानाचे फिफा मानकांनुसार नूतनीकरण केले जात होते. सुरक्षेच्या दृष्टीनेही आवश्यक उपाययोजना सुरू होत्या. राज्याचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीत तयारीचा आढावा घेण्यात आला होता.आता सामना रद्द झाल्यानंतर या सर्व तयारीवर पाणी फिरले आहे. अर्जेंटिना आणि मेस्सीला प्रत्यक्ष पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता वाढली असताना, एएफएच्या या निर्णयाने फुटबॉलप्रेमींना निराशा हाताशी लागली आहे.