दान करणे आपली संस्कृती!

    दिनांक :25-Oct-2025
Total Views |
 
वेध
 
विजय कुळकर्णी
donation देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, असे म्हटले जाते. हे आज आठवण्याचे कारण असे की, बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील श्रीराम कुटे गुरुजी फाऊंडेशनच्यावतीने शेगाव, संग्रामपूर व जळगाव जा. तालुक्यातील 2 हजार 100 अनाथ मुला-मुलींना दिवाळीनिमित्त कपडे व फराळाचे वितरण केले. चार वर्षांपासून फाऊंडेशन हा उपक्रम राबवीत आहे. तर खामगाव येथील श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने अंध, अपंग, मूक-बधिर व गरजूंना कपडे, महिलांना साड्या, मिठाई वितरित केली. शेगाव येथील अ. भा. ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडीने आदिवासी महिलांसाठी दिवाळीनिमित्त भेट म्हणून साड्या पाठविल्या. शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री निधीमध्ये 1 कोटी रुपयांचे योगदान दिले. भारतीय किंवा हिंदू संस्कृतीमध्ये देणे किंवा दान करण्याला खूप महत्त्व आहे. आपल्याकडे जे आहे त्यातून आपली गरज भागल्यानंतर शिल्लक राहिलेले गरजू किंवा ज्याला त्याची गरज आहे, अशा लोकांना दिले पाहिजे, अशी आपली संस्कृती शिकविते.
 
 
 

ओला दुष्काळ  
 
 
यावर्षी महाराष्ट्रावर निसर्गाने अवकृपा केली. अतिवृष्टी झाली. तीही अशी झाली की, ढगफुटीसदृश. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. केवळ पिकेच पुरात वाहून गेली नाहीत तर, शेतातील सुपिक माती वाहून गेली. हे नुकसान कधीही न भरून निघणारे आहे. कारण, पीक वाहून गेले तर, फार फार तर आर्थिक नुकसान होईल. आर्थिक नुकसान पुढील वर्षी किंवा त्याच्या पुढील वर्षी भरून निघून शकते. पण, शेती खरडून गेल्याने जी सुपिक माती पुरात वाहून गेली त्यामुळे ती शेती आयुष्यभरासाठी नापिक होणार आहे. कारण, विज्ञानाने कितीही प्रगती केली तरीही माती तयार करण्याचे तंत्रज्ञान मानवाला अजून अवगत झालेले नाही. अशा आपत्तिग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. या आपत्तिग्रस्त शेतकऱ्यांची ही दिवाळी अंधारातच गेली. दिवाळीपूर्वी महाराष्ट्र शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे सुरू केले. मदतनिधी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला किंवा होत आहे. त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, हे कोणीच नाकारू शकत नाही. तरीही अशा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विविध संस्था, देवस्थाने, सामाजिक संघटना, कर्मचारी शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री निधीत आपले योगदान देत आहेत. या सामाजिक कार्यात प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे.
आपल्यामुळे कोणाची तरी गरज भागली याचा आनंद खूप मोठा असतो. देण्याची कला आपण निसर्गापासून शिकलो पाहिजे. अगदी सकाळी झोपेतून उठल्यापासून जर आपण निसर्गाचे निरीक्षण केले तर, पहाटे सूर्य उगवल्यापासून सायंकाळी मावळेपर्यंत आपल्याला नि:शुल्क कोणतीही अपेक्षा न ठेवता सूर्य प्रकाश देतो. झाडे आपल्याला गार सावली, हवा आणि प्राणवायू कोणताही कर घेता अगदी मुक्तहस्ते आपल्याला देतात. पशु-पक्षी मंजुळ सुरांनी आपली करमणूक करतात. नदी, नाले विनामूल्य पाणी पुरवितात. ढगातून पर्जन्यवृष्टी होते. निसर्गापासून मिळणाऱ्या या सर्व गोष्टी मानवाला जगण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. या नसतील तर, मानव जात नष्ट होईल. या सर्व गोष्टी निसर्ग आपल्याला फुकट पुरवितो. तेव्हा, आपण देखील निसर्गापासून देणे किंवा दान करणे शिकले पाहिजे.donation आपल्या अवतीभोवती असलेल्या वंचितांना आपल्याकडे जे आहे त्यापैकी आपली गरज पूर्ण झाल्यावर जे शिल्लक राहील ते दिले पाहिजे. जगा आणि जगू द्या, या उक्तीनुसार गोरगरीब, आदिवासी, निराधार, दिव्यांगांना मदत केली पाहिजे. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी पैसेच खर्च केले पाहिजे, असे नाही तर आपल्याकडे असलेली पुस्तके आपण होतकरू विद्यार्थ्यांना देऊन त्यांची पुस्तकांची गरज भागवू शकतो. आपले जुने कपडे, ज्याच्या अंगावर कपडे नाहीत त्यांना देऊ शकतो. आपल्या किंवा आप्तेष्टांचा वाढदिवशी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना भोजन देऊ शकतो, अशा अनेक प्रकारे आपण दान करू शकतो. देशातील विविध मंदिरांकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती असल्याचे म्हटले जाते. पण, या देवस्थानांकडून केल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांबाबत कोणी बोलताना दिसत नाही. याबाबतीत शेगावचे श्री गजानन महाराज संस्थानचे उदाहरण देता येईल. या संस्थानद्वारे नाममात्र शुल्क घेऊन अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी व आयुर्वेदिक दवाखाने रुग्णांसाठी चालविले जातात. आपत्तिग्रस्तांना मदत केली जाते. आदिवासींसाठी विविध उपक्रम चालविले जातात. तेव्हा, याचा कित्ता गिरवीत आपणही समाजाला काही देणे लागतो, याचा विचार करून आपत्तिग्रस्तांना मदत केली पाहिजे.
8806006149
.........