मतदार ‘जंगलराज’च्या विरोधातच!

    दिनांक :25-Oct-2025
Total Views |
 
 
दिल्ली अग्रलेख
tejashwi yadav बिहार विधानसभा निवडणुकीत राजदच्या नेतृत्वातील महाआघाडीने माजी उपमुख्यमंत्री आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करत रालोआवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात महाआघाडीची सत्ता आली तर दोन वा तीन उपमुख्यमंत्री राहतील, असे सांगत त्यातील एक उपमुख्यमंत्री व्हीआयपीचे मुकेश सहानी असतील, असेही यावेळी सांगण्यात आले. उर्वरित दोन उपमुख्यमंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आली नसली तरी यातील एक दलित आणि दुसरा अल्पसंख्यक समाजाचा राहू शकतो. काँग्रेसलाही एक उपमुख्यमंत्रिपद मिळू शकते.
 
 

नितीश कुमार  
 
 
 
बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीविरुद्ध रालोआ अशी सरळ लढत होत आहे. महाआघाडीने तेजस्वी यादव यांना आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करताच रालोआने आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा, असे आव्हान दिले आहे. रालोआ हे आव्हान स्वीकारेल का याचे उत्तर येत्या एक-दोन दिवसांत मिळू शकेल. मात्र रालोआने आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याची गरज नाही. रालोआ ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आणि चेहऱ्यावर लढवत आहे. रालोआ विधानसभेची निवडणूक मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वात लढवत असली तरी तिने नितीशकुमार यांना आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केले नाही. निवडणुकीनंतर नवनिर्वाचित आमदार नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करतील, असे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे. शाह यांच्या विधानातून जसे नितीशकुमार मुख्यमंत्री होणारच नाही हे जसे समजत नाही, तसेच ते मुख्यमंत्री होतील, हेही स्पष्ट होत नाही. राजकारणात अनेकवेळा काही गोष्टी जशा जाहीर करायच्या असतात, तशाच काही गोष्टी योग्यवेळेसाठी राखून ठेवायच्या असतात. आपले सर्व पत्ते एकाच वेळी उघडे करायचे नसतात. अनेकवेळा विरोधकांना अंधारात ठेवणेही आवश्यक असते.
रालोआ मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढणार असल्यामुळे यावेळी बिहार विधानसभेची निवडणूक चाचा आणि भतिजा अशी होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. बिहारच्या राजकारणात चाचा हे नितीशकुमार आहेत, तर भतिजा तेजस्वी यादव. बिहारच्या राजकारणात लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार हे समवयस्क आणि समकालीन म्हटले पाहिजे. सुरुवातीला दोघे एकाच पक्षात होते. त्यामुळे आता राजकीय विरोधक झाले असले तरी कधीकाळी ते एकमेकांचे मित्रही होते. त्या नात्याने नितीशकुमार हे तेजस्वी यादव यांचे चाचा आहेत. भाजपाला सोडून नितीशकुमार यांनी राजदच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले त्यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळात तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री होते, त्यावेळी ते जाहीरपणे नितीशकुमार यांचा उल्लेख चाचा असा करत होते. चाचा भतिजाच्या या लढाईत कोण बाजी मारणार, काका मला वाचवा असे म्हणण्याची वेळ तेजस्वी यादव यांच्यावर येते की, पुतण्यापासून मला वाचवा, असे म्हणण्याची पाळी नितीशकुमार यांच्यावर येते, याचे उत्तर 14 नोव्हेंबरच्या मतमोजणीनंतरच मिळणार आहे.
तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करायला सुरुवातीला काँग्रेसचा विरोध होता. पण हा विरोध कसा मावळला, याचे उत्तर काँग्रेसचे नेतेच देऊ शकतील. राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीचा राजद हा भाग आहे. बिहारमध्ये मात्र याच्या उलट स्थिती आहे. राज्यात राजदच्या नेतृत्वातील महाआघाडीचा काँग्रेस हा भाग आहे. विशेष म्हणजे बिहारच्या राजकारणात काँग्रेस हा दुय्यम भूमिकेत आहे. राजदचा मांडलिक म्हणून त्याला वागावे लागते. राजद देईल तेवढ्या जागांवर निवडणूक लढवावी लागते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर राजदने टाकलेल्या भिकेच्या तुकड्यावर राज्यात काँग्रेसला जगावे लागते. राष्ट्रीय पातळीवरच्या एका पक्षाला राज्यातील प्रादेशिक पक्षाच्या भरवशावर राजकारणावर करावे लागणे ही काँग्रेससारख्या पक्षाला वाटीभर पाण्यात बुडून मरण्यासारखी स्थिती म्हणावी लागेल.
तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करत आपण बाजी मारली, असे महाआघाडीच्या नेत्यांना वाटत असले तरी असे करत त्यांनी आपल्या हाताने आपल्या पायावर दगड पाडून घेतला आहे. 950 कोटी रुपयांच्या बिहारमधील बहुचर्चित चारा घोटाळ्यातील आरोपी आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचे तेजस्वी यादव पुत्र. लालूप्रसादांवर चारा घोटाळ्यात तुरुंगात जायची वेळ आल्यानंतर राबडीदेवी यांनी एकदा नाही तर तीनवळा बिहारचे मुख्यमंत्रिपद भूषवले आहे. पतिभक्तपरायण राबडीदेवी यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. लालूप्रसादांना तर भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांत शिक्षाही झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये गाजलेल्या आयआरसीटीसी हॉटेल घोटाळ्यात लालूप्रसाद, राबडीदेवी आणि तेजस्वी यादव यांना दिल्लीतील एका न्यायालयात उपस्थित राहावे लागले.tejashwi yadav नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळ्यातही आरोप निश्चिततेची टांगती तलवार या तिघांच्या डोक्यावर आहे. तर खाण तशी माती या न्यायाने भ्रष्ट माता-पित्याच्या पोटी जन्मलेले तेजस्वी यादवही राजकारणात स्वच्छ प्रतिमेचे कसे काय राहू शकतील? तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करत महाआघाडीने बिहारच्या निवडणुकीत भाजपाला भ्रष्टाचाराचा आयता मुद्दा दिला आहे. नितीशकुमार सरकारवर अ‍ॅिंण्टइन्कमबन्सीचा आरोप करता येत असला तरी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप आतापर्यंत कोणाला करता आला नाही. लालुूप्रसादांनी आपल्या पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेल्या लालटेनप्रमाणे बिहारलाही लालटेनच्या युगात नेऊन ठेवले होते. भाजपा-जदयु युतीने राज्यातील जनतेला लालटेनच्या युगातून बाहेर काढले.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केल्यामुळे भाजपाला जंगलराजच्या मुद्यावरून राजदला घेरण्याची संधी मिळाली आहे. बिहारमध्ये लालूप्रसादांच्या कार्यकाळात शब्दश: जंगलराज होते. जंगली लोकांचा जंगली कायदा त्या राज्यात चालत होता. कायदा सुव्यवस्था त्या राज्यात नावालाही नव्हती. खून, दरोडे, खंडणी, अपहरण आणि बलात्काराच्या घटना प्रचंड वाढल्या होत्या. व्यापारी, डॉक्टर, वकील, अभियंते कोणीच बिहारमध्ये सुरक्षित नव्हते. बिहारमधील जंगलराजच्या घटना अंगावर काटे आणणाऱ्या होत्या. यादवांच्या राज्यात यादवीसदृश स्थिती उद्भवली होती. या जंगलराजला कंटाळून बिहारच्या जनतेने नितीशकुमार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला. भाजपा-जदयु युतीच्या हातात, तब्बल 20 वर्षे मधला काही थोडका अपवाद वगळता बिहारची सत्ता सोपवली होती. तेजस्वी यादव मुख्यमंत्री झाले तर बिहारमध्ये पुन्हा जंगलराजचे आगमन झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य लोकांचे जीवन धोक्यात येईल, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ होईल. बिहारला जंगलराजपासून वाचवण्याच्या एकमेव मुद्यावर बिहारची जनता यावेळी पुन्हा एकदा भाजपा-जदयु यांच्या युतीवर विश्वास ठेवल्याशिवाय राहणार नाही. रालोआने नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला काय किंवा न केला काय, त्याचा बिहारच्या जनतेवर कोणताही परिणाम होणार नाही. बिहारला जंगलराजपासून वाचवायचे असेल तर तेजस्वी यादव कोणत्याही स्थितीत मुख्यमंत्री होणार नाही, याची काळजी बिहारमधील जनतेला घ्यावी लागणार आहे. त्यासाठी महाआघाडीला सत्तेपासून दूर ठेवावे लागणार आहे. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करत आपण रालोआवर मात केली, असे जर महाआघाडीच्या नेत्यांना वाटत असेल तर ती त्यांची आत्मवंचना आहे. बिहारची जनता बिहारला जंगलराजपासून वाचवण्याच्या एकमेव मुद्यावर मतदान करणार आहे. भाजपा आणि जदयुच्या सरकारने जंगलराजपासून लोकांना वाचवत राज्याचा सर्वांगीण विकासही केला आहे. 2014 मध्ये केंद्रात मोदी यांचे सरकार आल्यापासून गेल्या 11 वर्षांत बिहारमध्ये अनेक मोठे प्रकल्प आणण्यात आले, विकासकामांची घोषणा करण्यात आली आहे, याची जाणीव राज्यातील जनतेला आहे. भाजपा-जदयु युतीचा बिहारचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल, याच्याशी जनतेला काही देणेघेणे नाही, त्यांना फक्त बिहारला जंगलराज होण्यापासून वाचवायचे आहे. ती फक्त बिहारच्या जनतेचीच नाही तर देशाचीही गरज आहे.