भावसार समाजाचा अखिल भारतीय उपवधू-वर परिचय मेळावा २ नोव्हेंबरला

27 Oct 2025 16:38:14
नागपूर,
Bhavsar Samaj Introduction Meeting भावसार क्षत्रिय समाजाच्या शताब्दी वर्षानिमित्त नागपूरमध्ये एक ऐतिहासिक आणि भव्य असा अखिल भारतीय उपवधू-वर परिचय मेळावा रविवार, २ नोव्हेंबर रोजी कविवर्य सुरेश भट सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे आयोजन ऑल इंडिया भावसार क्षत्रिय महासभा, भावसार कल्याणम्‌ ट्रस्ट आणि नागपूर भावसार क्षत्रिय समाज पंचकमेटी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
 

Bhavsar Samaj Introduction Meeting 
 
या सोहळ्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तसेच नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते, पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके, गिरीश वायचळ आणि देवराव फुलझेले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा मेळावा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड आदी राज्यांमधील वधू-वर आणि पालक सहभागी होणार आहेत. पालकांना त्यांच्या मुला-मुलींसाठी योग्य जोडीदार निवडण्यात मदत व्हावी म्हणून सर्व उपवधू-वरांची माहिती आणि संपर्क क्रमांकांसह एक "अनुरूप स्मरणिका" प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
 
२०१७ नंतर तब्बल आठ वर्षांनी पुन्हा एकदा नागपुरात हा मेळावा आयोजित होत असल्याने समाजबांधवांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. समाजातील सर्व भागांतील सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या मेळाव्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे  तो पूर्णतः ‘हायटेक’ आणि डिजिटल पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे. नोंदणी, प्रसिद्धी, संवाद सर्व प्रक्रिया ऑनलाइन माध्यमातून पार पडल्या आहेत. यंदा तब्बल ७५० पेक्षा अधिक उपवधू-वरांनी डिजिटल नोंदणी केली असून ही अभूतपूर्व संख्या आहे.
 
नागपूर भावसार क्षत्रिय समाज संस्थेच्या स्थापनेस 100 वर्ष पूर्ण झाल्यामुळे "शताब्दी महोत्सव वर्ष "निमित्त "भव्य सामूहिक विवाह सोहळा "नियोजित असून त्याकरिता "नागपूर शहरातील भावसार समाजातील कोणत्याही उप वधू -वराचे या मेळाव्यात लग्न जुळल्यास त्यांचे विवाहा चा संपूर्ण खर्च भावसार समाज संस्था "सामूहिक विवाह सोहळ्यात "करणार असा संस्थेचा संकल्प असल्याचे समाज अध्यक्ष मा राजेंद्र अंबारे यांनी पत्रकार परिषद प्रसंगी व्यक्त केले. 
 
पत्रकार बांधव आणि मीडिया प्रतिनिधींनीही या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन भावसार समाजाचे मुख्य प्रवक्ते अॅड. सुभाष गोजे यांनी केले आहे. या प्रसंगी देवराव फुलझेले, सुभाष गोजे, दीपक लखपती, गजानन साधनकर, शेखर अलोणे, अशोक बोरघरे, राजू धोटकर, सुभाष साधनकर, रामचंद्र काटले, दिलीप झाडे, अनंत धावंजेवार, महादेव अंबारे, राजेश दलाल, राजू मैंदळकर, पद्माकर अंबारे, गोविंद सुत्रावे आणि अरुण कळमकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. हा मेळावा समाजातील एकता, संस्कार आणि आधुनिकतेचा संगम ठरणार असून भावसार समाजासाठी अभिमानाचा सोहळा ठरेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
Powered By Sangraha 9.0