फलटण येथील डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी

    दिनांक :27-Oct-2025
Total Views |
बुलढाणा,
Dr. Sampada Munde from Phaltan फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्याची घटना संपूर्ण राज्याला हादरवणारी आहे. त्यांच्या मृत्यूपूर्वी स्वतःच्या तळहातावर लिहिलेल्या मजकुरातून पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांच्याकडून बलात्कार तसेच प्रशांत बनकर व इतरांकडून मानसिक व शारीरिक छळ झाल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. या आत्महत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी बुलढाणा जिल्हा शिवसेना उबाठा महिला आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत .मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
 
 
Dr. Sampada Munde from Phaltan
 
निवेदनात डॉ. मुंडे यांनी तत्कालीन पोलीस अधिक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार केली असूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले, ही बाब अत्यंत गंभीर आहे. पोलीस यंत्रणेतील अधिकार्‍यांवरच असे आरोप होणे हे कायदा सुव्यवस्थेच्या आणि राज्य प्रशासनाच्या प्रतिमेच्या दृष्टीने चिंताजनक आहे. याशिवाय, आरोपींना संरक्षण देण्यासाठी सत्ताधारी पक्षाशी संबंधित नेते स्थानिक प्रशासनावर अनुचित प्रभाव टाकत असल्याचेही समोर आले आहे. अशा प्रकारचा राजकीय हस्तक्षेप हा संविधान आणि कायद्याच्या शासनाच्या तत्त्वांना विरोधी आहे.
 
 
डॉ. मुंडे यांनी आपल्या सेवाकालात वैद्यकीय प्रामाणिकतेने काम करताना काही प्रकरणांमध्ये पोलीस दबाव नाकारला होता, त्यामुळेच त्यांच्या छळाची तीव्रता वाढली. त्यांनी या संदर्भात लेखी तक्रारी केल्या होत्या व माहिती अधिकाराखाली अर्जही दाखल केला होता. मात्र योग्य वेळी कारवाई न झाल्याने अखेरीस त्यांनी आत्महत्या करून जीवन संपविले. या प्रकरणात पोलिसांकडून निष्क्रियता, शवविच्छेदनात झालेला विलंब आणि प्राथमिक तपासातील त्रुटी या बाबी चौकशीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात.
 
 
या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि अशी मागणी बुलढाणा जिल्हा शिवसेना (उबाठा) महिला आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी शिवसेना प्रदेश प्रवक्त्या जयश्री शेळके, महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंदा बढे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख विजया खडसान, प्रतिक्षा पिंपळे, रत्ना शेळके, अनिता गायकवाड, सुनिता गाकवाड, स्मिता वराडे, शितल सुरडकर, सपना इंगळे, वंदना मेढे, श्रध्दा आराख, कविता भागीले, संगीता सोनुने, सुवर्णा जाधव, बेबी परिहार, सुनिता सुरडकर, शारदा दाभाडे, सरला चौथनकर, सविता राऊत, आरती जाधव, सुनिता दराखे, सोनाली वाघ, मिना इंगळे यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.