‘त्या’ दांडीबाज अधिकार्‍यांवर कारवाई होणार?

27 Oct 2025 19:58:40
गोंदिया, 
Goregaon Tehsil Office गोरेगाव येथील तहसील कार्यालयातील तहसीलदारांसह नायब तहसीलदार व काही अधिकारी कार्यालयीन वेळेत गैरहजर असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यावेळी तहसीलदार रजेवर तर नायब तहसीलदारांबद्दल मात्र, कुणालाही काही माहिती नसल्याचे तेथील कर्मचार्‍यांनी प्रत्यक्षदर्शी पाहणीत सांगितले होते. या प्रकरणाची दखल थेट जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनिल नाईक यांनी घेतली असून सोमवार 27 ऑक्टोबर रोजी गोंदिया जिल्ह्याच्या दौर्‍यावर असता त्यांनी तसे संकेत माध्यमांशी बोलताना दिले. तर जिल्हाधिकार्‍यांनीही चौकशी करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता ‘त्या’ दांडीबाज अधिकार्‍यांवर कारवाई होणार का? याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
 

Goregaon Tehsil Office 
 
शासनाकडून दिवाळी उत्सवाच्या 23 तारखेपर्यंत शासकीय सुट्ट्या दिल्यानंतर शुक्रवार 24 ऑक्टोबर रोजी सर्व शासकीय कार्यालय आपल्या नियमीत वेळेवर सुरू झाले. असे असताना गोरेगाव येथील तहसील कार्यालयातील काही नायब तहसीलदारांसह अनेक अधिकारी वरिष्ठांना कसलीच सुचना न देता कार्यालयात गैरहजर असल्याचे दिसून आले होते. प्रसंगी जिल्हाधिकारी यांना भ्रमणध्वनीवर याविषयी माहिती दिली असता त्यांनी तहसीलदार रजेवर असल्याचे सांगितले. मात्र, तहसीलदार रजेवर असले तरी त्यांच्या गैरहजेरीत नायब तहसीलदारांनी कार्यालयाची जबाबदारी पाहणे महत्वाचे होते. मात्र, 24 ऑक्टोबर रोजी दुपारपर्यंत एकही नायब तहसीलदार किंवा वरीष्ठ अधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे तहसील कार्यालयात विविध कामासाठी येणार्‍या नागरिकांची चांगलीच फजिती होत अनेकांना आल्यापावली परतावे लाले होते.
 
 
 
दरम्यान, सोमवारी जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनिल नाईक हे गोंदिया जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सदर प्रकाराची माहिती देत कारवाई होणार का अशी विचारणा केली असता त्यांनी अजीतदादा माझे नेते आहेत. त्यांचा मी चेला असून ते शिस्तबद्ध आहेत. ज्या जिल्ह्यात तुम्ही जाणार तिथे शिस्त लागलीच पाहिजे, असे निर्देश अजितदादांचे आहेत. आणि ती माझ्यासाठी नाही तर जे कोणी अधिकारी कर्मचारी असतील ते जनतेसाठी आहेत, याचं भान त्यांना असायला पाहिजे. आज, पहिला दिवस आहे. थोडं प्रेमाने आढावा घेतो पण शिस्त लावणार म्हणजे लावणार असा सुचक इशारा यावेळी पालकमंत्र्यांनी दिला. दरम्यान, जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्याशी याविषयी विचारणा केली असता त्यांनी याप्रकरणी निश्चितच चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असे माध्यमांना सांगितले.
Powered By Sangraha 9.0