पटियाला,
HIV-infected bride पैशाच्या हव्यासापोटी देवीगड येथील एका महिलेने सलग आठ पुरुषांशी लग्न करून त्यांना केवळ लुटण्याचे काम केले नाही. तर ती महिला एचआयव्ही बाधित असल्याचे समोर आलं असून तिच्याशी संबंध ठेवलेल्या सर्व वरांची प्रकृती आता गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. ही शिकारी वधू लग्नासाठी थोड्या वयस्कर पुरुषांना निवडायची. तिच्या या गुन्हेगारी टोळीत तिचा नवरा आणि काही नातेवाईकही सामील होते. जेव्हा ती एखाद्या नव्या वराशी भेटायची, तेव्हा ती आपल्या नवऱ्याची ओळख भाऊ असल्याचे करून द्यायची. हा ‘भाऊ’ म्हणजेच तिचा साथीदार तिला फसवणुकीत मदत करायचा. टोळीतील इतर सदस्य सुद्धा नातेवाईकांच्या नावाखाली त्या वराच्या कुटुंबाचा विश्वास जिंकायचे.
लग्नानंतर काही दिवसांनी ही महिला संधी साधून सासरच्या घरातून पैसे, दागिने आणि मौल्यवान वस्तू घेऊन फरार व्हायची. या फसवणुकीतून मिळणारा पैसा हेच तिच्या टोळीचं मुख्य उत्पन्नाचं साधन बनलं होतं. आश्चर्य म्हणजे, या वधूला आधीच तीन मुले असूनसुद्धा ती नवनव्या वरांना आपल्या जाळ्यात अडकवत राहिली. वधू नवव्यांदा लग्नाच्या तयारीत असतानाच पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करून तिला पकडलं. चौकशीत समोर आलं की ती महिला एचआयव्ही बाधित असूनही पुरुषांशी विवाह करून त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवत होती. यामुळे तिच्या आधीच्या आठ वरांची तब्येत गंभीर झाली आहे.
सध्या पोलिसांनी या वधू आणि तिच्या टोळीतील सदस्यांना अटक करून चौकशी सुरू केली आहे. त्यांच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरू आहे. या प्रकरणामुळे समाजात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी नागरिकांना सावधगिरीचा इशारा देत सांगितलं आहे की, कोणाशीही लग्न करण्यापूर्वी तिची पार्श्वभूमी आणि कुटुंबाचा सखोल तपास करावा. अन्यथा अशा शिकारी वधूंसारख्या फसवणूक करणाऱ्या टोळ्यांच्या जाळ्यात सापडण्याचा धोका टाळता येणार नाही.