कारंजा (घा.),
Karanja-Dhawadi road कारंजा शहरातून धावडी या गावाला जाणार्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. दरम्यान, नागरिकांनी आज २७ रोजी चाळण झालेल्याच रस्त्यावर बसून सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले. रस्ता तातडीने दुरुस्त करावा, या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद बांधकाम विभागाला देण्यात आले आहे. रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून दिला आहे. धावडी मार्गाने कारंजा शहरात प्रवेश करताना नवीन लेआऊटपासून महामार्ग ६ पर्यंत हा रस्ता पूर्णतः उखडलेला आहे. या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याने जाणे-येणे करताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. धावडी येथील बरेच विद्यार्थी कारंजा येथे शिक्षण घेण्याकरिता सायकलने शाळेत येतात. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्यामुळे विद्यार्थ्यांना नीट सायकल सुद्धा चालवता येत नाही.

अनेकदा या खड्ड्यांमुळे विद्यार्थी जखमी झाले आहेत. बर्याचदा दुचाकी चालक गाडी घेऊन या रस्त्यावर पडल्याचे प्रसंग घडलेले आहेत. तसेच शेतकरी सुद्धा याच मार्गाचा वापर करतात.बंडी-बैल, गाई, म्हशी यांची ये-जा सुद्धा याच मार्गाने असते. त्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांना होणारा त्रास व संभाव्य धोके लक्षात घेता सात दिवसात रस्त्याची दुरुस्ती करावी आणि पुढील दोन महिन्यात रस्त्याचे पके बांधकाम करण्यात यावे, असे निवेदनात नमुद केले आहे. सात दिवसानंतर रस्त्यावरील खड्डे बुजवले गेले नाही तर रस्त्यावरील खड्ड्यांची प्रतिकात्मक पूजा केल्या जाईल, असे नागरी समितीने म्हटले आहे. दोन महिन्यात पके बांधकाम न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. निवेदन जिपचे उपविभागीय अभियंता एफ. एस. मुल्ला यांनी स्वीकारले. निवेदन देतेवेळी कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीचे कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.