समुद्रपूर,
Accident on Gird-Sirsi road असलेल्यांपैकी कार अपघातात एकाचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवार २७ रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास गिरड—सिर्सी मार्गावरील सॅटीस्फॅशन बारजवळ झाला. पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एम.एच. ३० ए.झेड. ५१९२ क्रमांकाच्या एर्टिगा कारने विरुद्ध दिशेने येणार्या एम.एच. ३२ यू. २३६२ क्रमांकाच्या आयसर ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात हिमांशू गोन्नाडे (२४) रा. आरमोरी जि. गडचिरोली यांचा जागीच मृत्यू झाला तर वडील आत्माराम गोन्नाडे (५८), बहीण शिवानी धकाते आणि दीड वर्षांचा भाचा एशित धकाते हे गंभीर जखमी झाले असून त्यांना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती हॉटेल मालक तेजराम पडोळे यांनी सिर्सी पोलिस चौकीला दिल्यानंतर बेला पोलिस ठाण्याचे शिपाई ओम राठोड व सहकार्यांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात हलविले. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. ठाणेदार चेतनसिंह चव्हाण यांनी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, ट्रक चालक मोहम्मद रफीक शेख (रा. अड्याळ जि. भंडारा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उमरेड—गिरड—सिर्सी मार्ग सततच्या कोळसा वाहतुकीमुळे खराब झाला असून रस्त्याच्या कडेला भराव नसल्याने अपघातांची मालिका सुरू आहे. मृत हिमांशू गोन्नाडे हे माजी पोलिस कर्मचार्याचे पुत्र असून मेहनती आणि जबाबदार तरुण म्हणून ओळखले जातात.