हैदराबाद,
Chiranjeevi victim of deepfake तेलुगू चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता आणि मेगास्टार चिरंजीवी यांचे एआय-जनरेटेड डीपफेक पोर्नोग्राफिक व्हिडिओ सोशल मीडियावर आणि विविध अश्लील वेबसाइट्सवर प्रसारित झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. या घृणास्पद कृत्याविरोधात चिरंजीवींनी हैदराबाद सायबर क्राईम पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ आणि ६७ए, भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम २९४, २९६, ३३६(४) तसेच महिलांचे अश्लील प्रतिनिधित्व (प्रतिबंध) कायदा, १९८६ च्या कलम २(क), ३ आणि ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिरंजीवी यांनी त्यांच्या तक्रारीत नमूद केले आहे की कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे तयार केलेले हे बनावट व्हिडिओ त्यांची प्रतिमा आणि प्रतिष्ठा मलिन करण्याच्या उद्देशाने प्रसारित करण्यात आले आहेत.