नवी दिल्ली,
Gold price falls by Rs 4,300 सोने आणि चांदीच्या भावात गेल्या काही दिवसांपासून सतत वाढ होत असताना आता गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या २४ तासांत सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे चित्र बाजारपेठेत दिसत आहे. काल म्हणजेच २७ ऑक्टोबर रोजी सोन्याचा दर जीएसटीशिवाय ₹१,२२,५०० इतका होता. परंतु आज, २८ ऑक्टोबर रोजी या दरात तब्बल ₹४,३०० रुपयांची घसरण होऊन तो ₹१,१८,२०० रुपयांवर आला आहे. तर चांदीच्या दरातही जवळपास ₹६,००० रुपयांची घट झाली असून काल ₹१,५१,००० असलेला दर आज ₹१,४५,००० रुपयांवर घसरला आहे.

बाजारातील तज्ञांच्या मते, अमेरिकन डॉलरची मजबुती, अमेरिका-चीन व्यापार कराराबाबत येणाऱ्या सकारात्मक बातम्या आणि जागतिक तणाव कमी होण्याची शक्यता या सर्व घटकांमुळे मौल्यवान धातूंच्या किंमतीत घट झाली आहे. रशिया-युक्रेन तसेच इस्त्रायल-हमास संघर्षात शांतीची शक्यता वाढल्याने गुंतवणूकदारांची चिंता कमी झाली असून, त्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर स्पष्टपणे दिसतो आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच मलेशियात झालेल्या संमेलनात सांगितले की,“चीनसोबत आम्ही एक चांगला व्यापार करार करण्याच्या मार्गावर आहोत.
पुढील काही दिवसांत ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून गुंतवणूकदारांनी सोन्या-चांदीतून आपली गुंतवणूक कमी करण्यास सुरुवात केली आहे. तथापि, आर्थिक तज्ज्ञांच्या मते, अल्पकालीन चढ-उतार असूनही सोने दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अजूनही सर्वात सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय मानले जाते. २४ कॅरेट सोने गुंतवणुकीसाठी योग्य मानले जाते, तर १८ आणि २२ कॅरेट सोने दागिने बनवण्यासाठी वापरले जाते.