तभा वृत्तसेवा
महागाव,
mahagaon-shiv-sena-election : तालुक्यात शिवसेनेमध्ये सध्या ‘सगे-सोयरे’ गट सक्रिय झाल्याचे चित्र असून, सर्वसमावेशक राजकारणाला बगल देत केवळ नातेवाईक आणि एकाच समाजातील मित्रांना महत्त्वाच्या पदांवर संधी देण्यात आल्याने इतर समाजांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांमध्ये या धोरणामुळे इतर समाज शिवसेना पदाधिकाèयांची मस्ती उतरवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. महागाव तालुक्यातील शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणी आणि महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत उपजिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुख आपल्याच समाजातील नातेवाईक, मित्र असलेल्या कार्यकर्त्यांनाच प्राधान्य देत आहेत.
यात महत्त्वाचे तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, युवासेना यांसह विविध आघाडीची महत्वाची पदे देताना ‘रक्ताचे नाते’ आणि ‘समाजातील सोयरे’ यांनाच झुकते माप मिळाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. राजकीय पक्षबांधणी करताना विविध समाजघटकांना प्रतिनिधीत्व देणे, त्यांची ताकद ओळखणे आणि सर्वसमावेशक धोरण अपेक्षित असते.
मात्र, महागाव तालुक्यात शिवसेनेने या तत्त्वाला फाटा देण्यात आला आहे. विशेषतः मराठा, ओबीसी, दलित, आदिवासी आणि इतर अल्पसंख्याक समाजातील निष्ठावान कार्यकर्ते आणि नेत्यांना जाणूनबुजून डावलण्यात आल्याची तक्रार आहे. यामुळे अनेक जुने आणि निष्ठावान बाजूला फेकले गेल्याची भावना आहे.
ज्या समाजाने शिवसेनेच्या वाढीसाठी मेहनत घेतली, त्यांना कोणतीही विचारणा न करता केवळ एकाच विशिष्ट समाजाला पदे दिल्याने इतर समाजांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करूनही आम्हाला केवळ ‘कॅशियर’ म्हणून वापरले गेले, अशी खंत एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने व्यक्त केली.
होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत या ‘सगे-सोयरे’ पॅटर्नचा थेट परिणाम दिसण्याची शक्यता आहे. नाराज झालेले समाज आणि कार्यकर्ते यांनी एकत्र येत ‘ज्यांनी आम्हाला डावलले, त्यांची मस्ती उतरवण्याची’ तयारी सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले. मतांचे ध्रुवीकरण आणि बंडखोरी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
या संदर्भात शिवसेनेच्या तालुका नेतृत्वाने तातडीने पक्षांतर्गत समन्वय साधून सर्व समाज घटकांना न्याय दिला नाही, तर तालुक्यात पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, केवळ काही मोजक्या लोकांमध्ये पदे वाटून टाकल्याने पक्ष वाढण्याऐवजी संकुचित होत असल्याचे हे ठोस उदाहरण आहे.
पालकमंत्र्यांचेसुद्धा समाजालाच प्राधान्य..!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्कांसाठी शिवसेनेची स्थापना केली. त्यांनी जातीपातीच्या राजकारणाला कधीच थारा दिला नाही. परंतु त्याच बाळासाहेबांच्या तालमीत वाढलेले, यवतमाळ जिल्हा पालकमंत्री संजय राठोड यांनी मात्र महागाव तालुक्यात आपल्याच समाजातील उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख व इतर महत्वाची पदे देऊन केवळ आपल्या समाजालाच प्राधान्य देत इतर समाजातील कार्यकर्त्यांना महत्वाच्या जबाबदाèयांमधून वगळले असल्याची धुसफूस कार्यकर्ते करीत आहेत.