देहरादून,
New social norms in Uttarakhand उत्तराखंडमधील देहरादून जिल्ह्यातील चक्राता तालुक्यातील जौनसर-बावर परिसरातील कंदड आणि इंद्रोली या दोन छोट्या गावांनी एक ऐतिहासिक सामाजिक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, कोणतीही महिला लग्नात किंवा सामाजिक कार्यक्रमात तीनपेक्षा जास्त दागिने घालू शकणार नाही. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना तब्बल ५०,००० रुपयांचा दंड आकारला जाईल.
गावकऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयानुसार महिलांना केवळ मंगळसूत्र, नाकातील नथ आणि कानातले हे तीनच दागिने घालण्याची परवानगी असेल. गावातील सर्व समाजघटकांच्या एकमताने हा नियम लागू करण्यात आला असून तो सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, गेल्या काही वर्षांत लग्नसमारंभात सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा वापर झपाट्याने वाढला आहे. श्रीमंत कुटुंबांच्या दिखाव्यामुळे गरीब कुटुंबेही त्यांचे अनुकरण करत कर्जबाजारी होत आहेत.
एका वधूसाठी १० ते २० तोळ्यांचे सोने तयार करणे आता प्रतिष्ठेचा प्रश्न बनला होता. त्यामुळे आर्थिक असमानता आणि सामाजिक ताण वाढत होता. या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी एकमताने दागिन्यांवर मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला. गावातील महिला या निर्णयाचे स्वागत करत आहेत. यामुळे दिखाव्याला आळा बसेल आणि आर्थिक समता प्रस्थापित होईल, असे अमृता चौहान, तुलसी देवी, वर्षा देवी आणि टिकम सिंह यांसारख्या ग्रामस्थांनी सांगितले.
दरम्यान, स्थानिक तिलक सिंह यांनी पुढील टप्प्यात लग्नांमधील अनावश्यक खर्च आणि दारूच्या वापरावर देखील नियंत्रण आणण्याची गरज असल्याचे सांगितले. हा निर्णय सध्या केवळ सामाजिक बंधन नाही, तर एक सामाजिक सुधारणा आंदोलनाचे उदाहरण म्हणून पाहिला जात आहे. या नियमाचे पालन किती काटेकोरपणे होईल हे काळ ठरवेल, मात्र जौनसर-बावर परिसरातील या उपक्रमाचे राज्यभरातून जोरदार कौतुक होत आहे.