वर्धा,
No salary loan waiver शेतकर्यांची समस्या फार गंभीर झाली आहे. त्यांचा वाली कोणीच राहिलेला नाही. त्यांना निसर्ग आणि शेती माल दोन्हीही मारतो. शेतकरी आत्महत्येचा मार्ग निवडतो. आता शेतकर्यांच्या समस्या सोडण्यासाठी महाएल्गार ट्रॅटर रॅली काढण्यात आली आहे. या आंदोलनाला महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळतो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मोबाईल एसएमएसवर चर्चा झाली. आता समित्यावगैरेची आवश्यकता नाही. शेतकर्यांना न्याय मिळाल्याशिवाय माघार नाही. संपुर्ण पीक कर्ज माफीतून पगारदार आणि नेत्यांना वगळण्यात यावे, अशी माहिती माजी आमदार बच्चू कडू यांनी दिली. अमरावती जिल्ह्यातून सोमवार २७ रोजी महाएल्गार ट्रॅटर रॅली काढल्यानंतर आज २८ रोजी सकाळी वर्धा जिल्ह्यातील सुकळी बाई येथील हनुमान मंदिरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बच्चू कडू पुढे म्हणाले की, या महाएल्गार ट्रॅटर रॅलीच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगांच्या समस्या सोडवण्याची मागणी करीत आहोत. यापूर्वीही आंदोलनं केले, मागण्या केल्या. परंतु, तोडगा निघाला नाही. त्यामुळे आता पुन्हा आंदोलन करावे लागत आहे. महाराष्ट्राशेजारी असलेल्या तेलंगाना राज्यात हमी भाव दिल्या जातो. परंतु, महाराष्ट्रात हमी भाव जाहीर करूनही दिल्या जात नाही. मग, त्या हमी भावाचा अर्थ काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शेतकर्यांना भावांतर योजनेतून मदत दिल्या जावी, खरडून गेलेल्या शेतजमिनींची महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतच्या माध्यमातून दुरुस्ती करून देण्यात यावी, शेतकर्यांसाठी महामंडळ स्थापन करण्यात यावे अशी मागणी करून हात, पाय, डोळे नसलेल्या दिव्यांगांसाठी आंदोलन करावे लागते, ही शोकांतिका असल्याचे त्यांनी सांगितले. आता आम्ही रस्त्यावर येऊन मरू असा शेतकर्यांनी निर्धार केला आहे.
आम्ही आमदार कापा म्हटले तर यांना संविधान आणि लोकशाही आठवली. शेतकरी रोज मरतो त्याचे काय असा सवालही त्यांनी केला. आम्ही समिती नेमुन थांबणार नाही. आम्हाला चर्चेसाठी मुंबई बोलवल्यापेक्षा तुमचे प्रतिनिधी पाठवा असे सांगुन मुख्यमंत्र्यांनी शेतकर्यांना कमी समजू नये, असे त्यांनी सांगितले. शेतकरी मेहनतीत कमी नाही, शासकीय धोरणच चुकीचे आहे. स्वातंत्र्यापूर्वी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आंदोलन करावे लागले होते. आता स्वातंत्र्यानंतर शेतकर्यांच्या आत्महत्या होऊ नयेसाठी आंदोलन करावे लागत आहे. संपूर्ण कर्ज माफीतील अटी व शर्थी संदर्भात त्यांना विचारले असता नोकरीवर असलेल्यांना तसेच आमच्या सारख्या पेन्शन घेणार्या नेत्यांनाही कर्ज माफी देऊ नये, असेही ते म्हणाले.