तिवसा,
Saathi Portal News बियाणे खरेदी-विक्रीसाठी शासनाने सुरू केलेल्या ‘साथी पोर्टल’ या यंत्रणेविरुद्ध जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील कृषी सेवा केंद्र धारकांनी एकत्रित येऊन तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या पोर्टलद्वारे बियाण्यांची खरेदी-विक्री करणे तांत्रिकदृष्ट्या अवघड, वेळखाऊ तसेच आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याचे मत विक्रेत्यांनी नोंदवले. साथी पोर्टलवर व्यवहार करताना सतत येणार्या तांत्रिक अडचणी, इंटरनेट व संगणक सुसज्ज यंत्रणेचा अभाव, तसेच कुशल मनुष्यबळाची कमतरता यामुळे प्रत्यक्ष व्यवहारात मोठे अडथळे निर्माण होत आहेत. ग्रामीण भागातील बहुतांश विक्रेत्यांकडे संगणक, प्रशिक्षित कर्मचारी किंवा तांत्रिक साधने उपलब्ध नसल्यामुळे ही प्रणाली व्यवहार्य नाही, असा सूर सर्वच विक्रेत्यांमध्ये दिसून आला. या पृष्ठभूमीवर तिवसा तालुका कृषी साहित्य विक्रेता संघाच्या वतीने २८ ऑक्टोबर रोजी संपूर्ण तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांनी बंद पाळत एक दिवसीय लाक्षणिक बंद केले. या आंदोलनातून शासनाचे लक्ष या गंभीर समस्येकडे वेधण्यात आले.
विक्रेत्यांनी स्पष्टपणे सांगितले की साथी पोर्टलद्वारे बियाण्यांची खरेदी-विक्री करणे आम्हाला शक्य नाही. या पोर्टलद्वारे येणारे बियाणे आम्ही स्वीकारणार नाही; मात्र पोर्टलबाहेरील बियाण्यांच्या खरेदी-विक्रीस आमची हरकत नाही. या बंद आंदोलनाचे नेतृत्व तिवसा कृषी सेवा केंद्र संघाचे तालुकाध्यक्ष सतीश सावरकर यांनी केले. संघटनेचे उपाध्यक्ष योगेश साबू, शहर उपाध्यक्ष किशोर दिवे, सचिव विलास हांडे, कोषाध्यक्ष गोपाल भुतडा, तसेच रवींद्र साखरवाडे, आशिष सकर्डे, मनोज गोरे, संजय जाजू, सिद्धेश बोडखे, निलेश झंवर, अक्षय पाटील, सुमित गांधी, अमोल मडगे, विनोद डेहनकर, विशाल खाकोले, निलेश पांडे, प्रशांत वानखडे, अक्षय केचे, किरण मोहल्ले आदींनी आंदोलनात सहभाग घेतला. या लाक्षणिक उपोषणाद्वारे कृषी सेवा केंद्र चालकांनी शासनास आवाहन केले की, ग्रामीण भागाच्या परिस्थितीला धरून व्यवहार्य व सुलभ पर्याय उपलब्ध करून द्यावेत, अन्यथा अशा तांत्रिक पोर्टल प्रणालीच्या विरोधात आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.