शिक्षण विभागाचा कारभार...शिष्यवृत्ती आणि सिटीईटी परीक्षा एकाच दिवशी!

28 Oct 2025 21:20:46
मुंबई,
Scholarship and CITYET exam on the same day महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांनाही लागू असलेल्या दोन मोठ्या परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने शिक्षण क्षेत्रात गोंधळ निर्माण झाला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्याच दिवशी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा देखील होणार असल्याने शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्याकडून विरोधाचा सूर उमटू लागला आहे. परीक्षा परिषदेच्या नियोजनानुसार, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया २४ ऑक्टोबरपासून सुरू झाली असून ३० नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरता येतील. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शुल्क १२५ रुपये तर खुल्या गटासाठी २०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्रे एकाच दिवशी तयार ठेवण्यात येणार आहेत.
 
 

Scholarship and CITYET exam on the same day
तथापि, त्याच दिवशी CTET परीक्षा असल्यानं अनेक शिक्षकांना प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेत सहभागी होता येणार नाही, अशी अडचण पुढे आली आहे. त्यामुळे शिक्षक संघटनांकडून आणि पालक वर्गाकडून परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र, राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी अद्याप तारखेत बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.  दरम्यान, शिष्यवृत्ती परीक्षेच्या स्वरूपातही २०२५-२६ पासून मोठा बदल होणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून ही परीक्षा इयत्ता चौथी आणि सातवीसाठी घेतली जाणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी २०२६ ही पाचवी-आठवी स्तराची शेवटची परीक्षा ठरणार असून, एप्रिल-मे २०२६ मध्ये चौथी-सातवीची पहिली परीक्षा होईल.
 
या नव्या रचनेनुसार, चौथी स्तरासाठी दरवर्षी ५,००० रुपये (मासिक ५००) आणि सातवी स्तरासाठी ७,५०० रुपये (मासिक ७५०) शिष्यवृत्ती तीन वर्षांसाठी देण्यात येणार आहे. चौथी-पाचवी गटासाठी १६,६९३, तर सातवी-आठवी गटासाठी १६,५८८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल. सुमारे ७० वर्षांपासून सुरु असलेली ही योजना ग्रामीण व नागरी भागातील गुणवान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राबवली जाते. तथापि, या वेळी परीक्षेच्या तारखा जुळल्याने प्रशासनासमोर नवी अडचण निर्माण झाली आहे. आता शिक्षण विभाग आणि राज्य परीक्षा परिषद या दोघांमधून कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0