मुंबई,
Sharad Pawar group राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत घेतली. मात्र या बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदार अनुपस्थित राहिल्याने पक्षात मोठ्या असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घडामोडीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचे आमदार नारायण पाटील, माळशिरसचे आमदार उत्तम जानकर आणि मोहोळचे आमदार राजू खरे हे तिघेही या बैठकीला गैरहजर होते.
या गैरहजेरीमुळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे, या बैठकीला फक्त पक्षाचे सोलापूरचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार अभिजीत पाटील हे उपस्थित होते. भाजपाने सोलापूर जिल्ह्यात “ऑपरेशन लोटस”ची चळवळ सुरू केल्याची चर्चा आहे. अजित पवार गटातील काही माजी आमदार भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या हालचाली करत असल्याची माहिती आहे. अशा पार्श्वभूमीवर शरद पवार गटातील तीन विद्यमान आमदारांच्या अनुपस्थितीने नवीन राजकीय चर्चांना जोर आला आहे. हे आमदार शरद पवार यांच्याबद्दल असंतोष व्यक्त करून पुढील काळात वेगळी भूमिका घेणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी मात्र स्पष्ट केले की, आमदार उत्तम जानकर दिल्लीतील एका प्रकरणामुळे बैठकीस येऊ शकले नाहीत, तर करमाळ्याचे आमदार नारायण पाटील आणि मोहोळचे आमदार राजू खरे यांनी पूर्वसूचना देऊन अनुपस्थिती कळवली होती. तरीही या अनुपस्थितीमुळे जिल्ह्यातील पक्षांतर्गत गटबाजी आणि असंतोषावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. आजच्या बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक तालुक्यातील स्थानिक आघाड्यांना एकत्र आणण्याचा निर्णयही घेण्यात आला. तसेच, जिल्हाध्यक्ष शिंदे आणि सोलापूर जिल्हा प्रभारी पाटील नोव्हेंबरमध्ये सोलापूर दौरा करून कार्यकर्त्यांची बैठक घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले. आता सर्वांच्या नजरा सोलापूर जिल्ह्यातील या तीन आमदारांच्या पुढील भूमिकेवर खिळल्या आहेत. त्यांच्या निर्णयावरच सोलापूरच्या राजकीय भवितव्याचे समीकरण ठरणार आहे.