केपटाऊन,
South Africa Grey List जवळपास तीन वर्षांच्या प्रयत्नांनंतर दक्षिण आफ्रिकेला अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स या जागतिक आर्थिक निरीक्षण संस्थेने देशाचे नाव दहशतवादी वित्तपुरवठा आणि मनी लाँडरिंगसाठी असलेल्या "ग्रे लिस्ट"मधून वगळले आहे. पॅरिस येथे झालेल्यातीन दिवसांच्या पूर्ण बैठकीनंतर गेल्या आठवड्यात हा निर्णय जाहीर करण्यात आला.
FATF च्या ग्रे लिस्टमधील देशांवर कठोर लक्ष ठेवले जाते. या देशांना मनी लाँडरिंग, दहशतवादी वित्तपुरवठा आणि त्यासंबंधित धोरणात्मक त्रुटी दूर करण्यासाठी ठोस पावले उचलावी लागतात. दक्षिण आफ्रिकेने गेल्या ३२ महिन्यांत याच दिशेने सातत्याने प्रयत्न केले. दक्षिण आफ्रिकेच्या अर्थ मंत्रालयाने एका निवेदनात सांगितले की, “FATF ने नेमलेल्या पुनरावलोकनकर्त्यांच्या पथकाशी सातत्याने सहकार्य करत आम्ही कृती आराखड्यातील सर्व मुद्द्यांवर प्रगती केली आहे. जुलै २०२५ च्या अखेरीस या पथकाने देशाची सखोल तपासणी केली आणि सुधारणा प्रभावीपणे अंमलात आणल्या गेल्याची पुष्टी केली.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, मनी लाँडरिंगविरोधी आणि दहशतवादाच्या वित्तपुरवठ्याला आळा घालण्यासाठी (AML/CFT) प्रणाली अधिक मजबूत करण्याबाबत दक्षिण आफ्रिकेचे सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे. मात्र, FATF च्या ग्रे लिस्टमध्ये पुन्हा समावेश होऊ नये म्हणून कोणतीही निष्काळजीपणा न दाखवण्याचा इशाराही मंत्रालयाने दिला आहे. दक्षिण आफ्रिकेसोबतच, FATF ने नायजेरिया, मोझांबिक आणि बुर्किना फासो या देशांनाही त्यांच्या ग्रे लिस्टमधून वगळले आहे. या निर्णयामुळे आफ्रिकन देशांच्या आर्थिक प्रतिमेत सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.