चंद्रपूर,
Tiger's journey to Telangana प्रेमाच्या कथा आपण माणसांमध्ये ऐकतो, पण निसर्गातही कधी कधी अशा भावनिक कहाण्या घडतात ज्या मनाला स्पर्शून जातात. महाराष्ट्रातील चंद्रपूरच्या जंगलातून एका वाघाने आपल्या जोडीदाराच्या शोधात तब्बल ५० किलोमीटरचा लांब प्रवास करत तेलंगणाच्या जंगलापर्यंतचा प्रवास केला आहे. हा वाघ आपल्या ‘वाघिणीच्या शोधात’ चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हारगाव वन्यजीव अभयारण्य सोडून गेला. मार्गात त्याने पराहिता नदी पोहत ओलांडली आणि अनेक अडथळ्यांचा सामना करत तेलंगणातील कागजनगर टायगर कॉरिडॉरमध्ये प्रवेश केला. हा प्रवास सोपा नव्हत नद्या, टेकड्या, आणि इतर वाघांच्या अधिवासातून जाण्याचा धोका होता. तरीसुद्धा, प्रेमाच्या ओढीने त्याने सारे धोके पार केले.
वन विभागाने सांगितले की, वाघाच्या हालचालींवर कॅमेरा ट्रॅपद्वारे बारकाईने लक्ष ठेवले जात होते. त्याच्या प्रत्येक हालचालीची नोंद घेतली गेली. तज्ज्ञांच्या मते, ऑक्टोबर ते डिसेंबर हा वाघांचा मिलनाचा हंगाम असतो, आणि या काळात ते जोडीदार, अन्न आणि पाण्याच्या शोधात लांब प्रवास करतात. वन अधिकाऱ्यांनी सांगितले की हा वाघ गावांच्या जवळून गेल्याची शक्यता आहे. त्यामुळे गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, जर पशुधनाचे नुकसान झाले, तर त्यासाठी भरपाईची तरतूद करण्यात आली आहे. वन विभागाच्या म्हणण्यानुसार, काही वाघ नदी ओलांडून परत आपल्या अधिवासात येतात, पण काहीजण नव्या परिसरातच रमून राहतात. हा वाघ मात्र आपल्या प्रेमाच्या शोधात सीमाही ओलांडून गेला हा चर्चेचा विषय आहे.