लखनऊ,
Uttar Pradesh Lucknow News उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ पुन्हा एकदा धक्कादायक घटनेमुळे चर्चेत आली आहे. मडियांव पोलिस स्टेशन परिसरातील एल्डेको सिटी सोसायटीमध्ये राहणाऱ्या शालू चौरसिया या तरुणीने सोसायटीच्या सचिवावर (सेक्रेटरी) गंभीर आरोप केले आहेत. तिच्या मते, सेक्रेटरी रमन सिंग गेल्या दोन महिन्यांपासून तिला त्रास देत होता आणि शारीरिक संबंधांची मागणी करत होता. शालूने या संबंधांना ठाम नकार दिल्यानंतर रमन सिंगने तिला धमक्या देण्यास सुरुवात केली. तिच्या आरोपानुसार, त्याने दोन तरुणांना तिच्या मागे लावले आणि त्यांनी तिच्या स्कूटरवर हल्ला केला. शालूने प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच तिच्यावर शिवीगाळ करण्यात आली आणि काही दिवसांनंतर रमन सिंग स्वतः तिच्या फ्लॅटमध्ये घुसून तिच्यावर आणि तिच्या भावावर हल्ला केला, असा धक्कादायक दावा शालूने केला आहे.
या घटनेनंतर शालू थेट मडियांव पोलीस ठाण्यात पोहोचली. मात्र, तिचा आरोप आहे की पोलिसांनी तिची तक्रार नोंदवण्यास सुरुवातीला नकार दिला. त्यामुळे तिने आणि तिच्या भावाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ बनवून न्यायासाठी आर्त हाक दिली. हा व्हिडिओ काही तासांतच व्हायरल झाला आणि त्यानंतर पोलिस यंत्रणा तत्परतेने हलली. पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या तक्रारीवरून रमन सिंग आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे आणि संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू आहे.
मात्र, या घटनेने वळण घेतले आहे कारण सोसायटीतील काही रहिवाशांनी शालूच्या आरोपांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. डॉ. कल्पना भदोरिया यांनी व्हायरल व्हिडिओला “पूर्वनियोजित नाटक” म्हटलं आहे. त्यांच्या मते, शालूने यापूर्वीही रमन सिंगवर विनयभंगाचा आरोप केला होता, पण पोलिस स्टेशनमध्ये ती त्याला ओळखू शकली नव्हती. तर, आणखी एक रहिवासी ममता यांनी शालूच्या वर्तनावर टीका करत सांगितलं की ती अनेकदा सुरक्षारक्षकांशी गैरवर्तन करते, त्यांच्याशी मारहाण करते आणि त्यांच्या मोबाईल फोनसुद्धा फोडते. तिच्या वर्तनाबाबत घरमालकाकडे लेखी तक्रार देखील करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.