यवतमाळात एकता संदेश भव्य पदयात्रा

28 Oct 2025 18:45:35
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
Vikas Meena : युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय व माय भारत यांच्या विद्यमाने ‘सरदार 150 युनिटी मार्च’ या भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील हा कार्यक्रम शुक्रवार, 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता अमोलकचंद महाविद्यालयात होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी पत्रपरिषदेत दिली.
 
 

y28Oct-Vikas-Meena 
 
 
पुढे बोलताना मीना म्हणाले, हा उपक्रम भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येत आहे. तरुणांमध्ये राष्ट्रीय अभिमान, एकता, देशभक्ती आणि सामाजिक जबाबदारीची भावना जागविण्याच्या उद्देशाने ही पदयात्रा देशभर राबवली जात आहे.
 
 
कार्यक्रमाच्या प्रारंभी सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून आत्मनिर्भर भारत व ड्रग्जमुक्त भारत यांची प्रतिज्ञा घेण्यात येईल. त्यानंतर विद्यार्थी, स्वयंसेवक आणि नागरिकांनी एकतेचा संदेश देत अमोलकचंद महाविद्यालय, अँग्लो हिंदी शाळा, जाजू चौक, दत्त चौक, माईंदे चौक मार्गे, परत अमोलकचंद महाविद्यालय अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे.
 
 
या कार्यक्रमात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, माय भारतचे प्रतिनिधी, एनसीसी अधिकारी, विद्यार्थी, युवा नेते तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत. पदयात्रेनंतर सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात येईल.
 
 
‘सरदार 150 युनिटी मार्च’ अंतर्गत देशभरात 31 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीत जिल्हास्तर पदयात्रा होत असून, त्यानंतर 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान करमसद (सरदार पटेलांचे जन्मस्थान) ते केवडिया येथील ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ दरम्यान 152 किमीची राष्ट्रीय पदयात्रा काढण्यात येणार आहे.
 
 
संपूर्ण देशातील तरुणांना या ऐतिहासिक उपक्रमात सहभागी होण्याचे आणि राष्ट्र उभारणीत सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0