वॉशिंग्टन,
Young people avoid drinking दारू पिणे आरोग्यासाठी अपायकारक आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. तरीही जगभरातील मोठ्या लोकसंख्येचा एक भाग पार्टी किंवा ताणतणाव कमी करण्याच्या कारणाने मद्यपान करतो. मात्र आता यात एक नवा आणि सकारात्मक बदल दिसून येत आहे. एका जागतिक अहवालानुसार, तरुण पिढी म्हणजेच जेन-झी जनरेशन झेड (१९९७ ते २०१२ दरम्यान जन्मलेले) मोठ्या प्रमाणावर दारू टाळण्याचा निर्णय घेत आहेत.
अहवालानुसार, कायदेशीररित्या मद्यपान करण्याच्या वयात आलेल्या तरुणांपैकी तब्बल ३६ टक्के लोकांनी कधीही दारू पिलेली नाही. हे प्रमाण मागील दशकांच्या तुलनेत खूपच जास्त आहे. आरोग्याविषयी वाढती जागरूकता हे या बदलामागच सर्वात मोठ कारण असल्याचे अहवालात नमूद करण्यात आल आहे.
८७ टक्के तरुणांनी स्पष्ट सांगितले की ते दारू पित नाहीत कारण त्यांना आपले आरोग्य जपायचे आहे आणि भविष्यात गंभीर आजारांचा धोका टाळायचा आहे. तर ३० टक्के लोकांनी पैशांची बचत हे कारण दिले, आणि २५ टक्के तरुणांनी चांगली झोप घेण्यासाठी दारू टाळण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. अहवालात 'झेब्रा स्ट्रिपिंग' नावाच्या एका नव्या सामाजिक ट्रेंडचाही उल्लेख करण्यात आला आहे. या ट्रेंडनुसार तरुण पार्ट्यांमध्ये अल्कोहोलिक आणि नॉन-अल्कोहोलिक दोन्ही प्रकारची पेये घेतात, जेणेकरून त्यांना दारूचे प्रमाण कमी ठेवता येईल आणि संयम राखता येईल.
नियमित मद्यपान करणाऱ्यांची संख्या देखील घटताना दिसते आहे. २०२० मध्ये दर आठवड्याला २३ टक्के लोक मद्यपान करत होते, तर २०२५ मध्ये हे प्रमाण केवळ १७ टक्क्यांवर येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अधूनमधून दारू पिणाऱ्यांपैकी निम्म्याहून अधिक लोक आता त्यांचे सेवन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तथापि, जागतिक पातळीवर अल्कोहोलचा बाजार अजूनही प्रचंड आहे. २०२४ मध्ये एकूण जागतिक मद्यवापर २५३ अब्ज लिटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. भारतात मात्र उलट चित्र दिसते आहे. येथे २०२४ ते २०२९ दरम्यान ३५७ दशलक्ष लिटरने अल्कोहोलचा वापर वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
त्यामुळे भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मद्यबाजारांपैकी एक ठरतो आहे. मात्र, या सर्वांमध्ये एक सकारात्मक बाजू अशी आहे की जगभरातील तरुण पिढी आता अल्कोहोलपासून दूर जात आहे आणि अल्कोहोल-फ्री स्पिरिट्स किंवा पेयांकडे अधिक आकर्षित होत आहे. अल्कोहोल विक्रीत केवळ ०.६ टक्क्यांची वाढ झाली असताना, अल्कोहोल नसलेल्या पेयांच्या विक्रीत तब्बल १७ टक्क्यांनी वाढ झाल्याचंही अहवालात नमूद आहे.