नवी दिल्ली,
Anger at Rahul Gandhi बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपावर तीव्र हल्ला चढविला आहे. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की, “शिक्षण, आरोग्य आणि इतर मूलभूत सुविधा नागरिकांना संविधानामुळे मिळाल्या आहेत, परंतु नरेंद्र मोदी आणि आरएसएस या अधिकारांवर वारंवार हल्ला करत आहेत. ते मते चोरतात, संस्थांना कमकुवत करतात आणि लोकशाहीला धक्का देतात. राहुल गांधी यांच्या या विधानावर भाजपाचे बिहार निवडणूक प्रभारी व केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
त्यांनी म्हटले की, राहुल गांधी यांनी आज सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि छठसारख्या लोकश्रद्धेच्या सणाचा अपमान केला आहे. केवळ पराभवाच्या भीतीमुळे ते अशा शब्दांत बोलत आहेत. गेल्या दोन दशकांपासून बिहारची जनता राजद आणि काँग्रेसच्या जंगलराजला नाकारत आली आहे. त्यांनी तरुणांच्या आकांक्षा चिरडल्या, विकास थांबवला आणि भीतीचे वातावरण निर्माण केले.
प्रधान पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांना बिहारच्या प्रगतीचा हेवा वाटतो. त्यांनी याआधीही पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींचा अपमान केला होता आणि आता त्यांनी बिहारच्या पवित्र भूमीवरून छठसारख्या लोकभावनेच्या उत्सवाला लक्ष्य केले आहे. त्यामुळे लाखो भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. या वक्तव्यांतून राहुल गांधींचा सनातन संस्कृतीबद्दलचा द्वेष स्पष्ट दिसून येतो.
धर्मेंद्र प्रधान यांनी असा आरोपही केला की, राहुल गांधी, तेजस्वी यादव आणि त्यांच्या युतीने बिहारमधील गरीब, शेतकरी, महिला आणि तरुण यांच्या आकांक्षा कायम दुर्लक्षित केल्या आहेत. आज पराभवाच्या भीतीने ते असभ्य आणि अपमानास्पद भाषा वापरत आहेत. बिहारच्या जनतेला विकास, सुशासन आणि स्थिरता हवी आहे. त्यांना घराणेशाही आणि द्वेषाचे राजकारण नको आहे. शेवटी प्रधान यांनी स्पष्ट मागणी केली की, राहुल गांधी यांनी छठसण आणि पंतप्रधानांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल बिहार आणि देशातील जनतेची जाहीर माफी मागावी.