मुंबई,
deepika padukone अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या अनेक मोठ्या प्रकल्पांमध्ये व्यस्त आहे. दिग्दर्शक अॅटली आणि अभिनेता अल्लू अर्जुनसोबत ती एका मोठ्या चित्रपटावर काम करत आहे, तसेच शाहरुख खानच्या ‘किंग’ या चित्रपटाचं शूटिंग ती आधीच पूर्ण करून बसली आहे. मात्र, प्रभासच्या सुपरहिट ‘काळ्की 2898 ए.डीच्या सिक्वेलमधून तिचं नाव वगळल्याची बातमी काही काळापूर्वी समोर आली होती. निर्मात्यांनीही ही माहिती अधिकृतपणे पुष्टी केली होती.
दीपिका पदुकोणला या प्रकल्पातून का वगळण्यात आलं, याबाबत निर्माते किंवा अभिनेत्री यांच्याकडून काही स्पष्ट कारण देण्यात आलं नव्हतं. मात्र, चर्चांनुसार दीपिकाच्या वाढलेल्या मानधनाच्या मागणीमुळे हा वाद निर्माण झाल्याचं म्हटलं जात होतं.आता पुन्हा एकदा दीपिका ‘काळ्की 2898 ए.डी.’ संदर्भात चर्चेत आली आहे. कारण, सोशल मीडियावर अशी चर्चा रंगली की OTT प्लॅटफॉर्मवरील चित्रपटाच्या आवृत्तीतून दीपिकाचं नाव एंड क्रेडिट सीन्समधून काढून टाकण्यात आलं आहे. एक्स (माजी ट्विटर) वर दीपिकाच्या एका फॅन पेजने यासंबंधी फोटो शेअर करत नाराजी व्यक्त केली. त्यांनी लिहिलं, “चित्रपटाच्या शेवटच्या क्रेडिट्समध्ये फक्त नावे नसतात, ती त्या कलाकारांच्या योगदानाबद्दल आदर आणि जबाबदारी दर्शवतात. दीपिका पदुकोणसारख्या अभिनेत्रीचं नाव, जिने चित्रपटाच्या भावनिक अंगाला आकार दिला, जर OTT आवृत्तीमधून काढलं गेलं असेल, तर हा अन्याय आहे.”
या पोस्टनंतर दीपिकाच्या चाहत्यांमध्ये संतापाची लाट पसरली. काहींनी निर्मात्यांकडे याबाबत उत्तर मागितलं, तर काहींनी हे ‘न्याय नाकारणं’ असल्याचं म्हटलं. मात्र, लवकरच ही पोस्ट डिलीट करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या काही युजर्सनी ‘काळ्की 2898 ए.डी.’ च्या हिंदी OTT आवृत्तीचे स्क्रीनशॉट शेअर केले, ज्यात दीपिका पदुकोणचं नाव स्पष्टपणे एंड क्रेडिटमध्ये दिसत होतं.या नवीन पुराव्यानंतर हे स्पष्ट झालं की सोशल मीडियावरचा गोंधळ चुकीच्या माहितीमुळे झाला होता आणि दीपिकाचं नाव OTT आवृत्तीमधून हटवण्यात आलेलं नाही. तथापि, या प्रकरणावर अद्याप ना निर्मात्यांकडून ना दीपिकाकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.‘काळ्की 2898 ए.डीच्या यशानंतर त्याच्या सिक्वेलची मोठी चर्चा सुरु आहे. मात्र, दीपिका पदुकोणच्या अनुपस्थितीमुळे आणि या गोंधळामुळे पुन्हा एकदा तिचं नाव चर्चेचा विषय बनलं आहे. आता चाहत्यांना अपेक्षा आहे की अभिनेत्री आणि निर्माते दोघेही या विषयावर लवकरच भूमिका स्पष्ट करतील.