नागपूर,
Farmers' strike in Nagpur: Fadnavis नागपूरमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाने राज्यातील राजकीय वातावरण तापवले असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी नागपूर-हैदराबाद महामार्गासह विविध मार्गांवर चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी हे आंदोलन तीव्र होत असतानाच, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकार शेतकऱ्यांबाबत संवेदनशील असून चर्चा मार्गाने तोडगा काढला जाईल, असे स्पष्ट केले आहे.
मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सरकारच्या विचाराधीन आहे. आम्ही कर्जमाफी करणार नाही, असे कधीच म्हटलेले नाही. मात्र आंदोलकांनी जनतेला त्रास होईल अशा प्रकारच्या कृती टाळाव्यात. त्यांनी पुढे सांगितले की, अशा आंदोलनांमध्ये अनेकदा काही हौसे, नवसे आणि गवसे” लोक शिरतात आणि आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे शेतकरी संघटनांनी सावध राहणे गरजेचे आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आम्ही आधीच ३२ हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळेल. त्यांनी आंदोलकांना आवाहन केले की, चर्चा आणि संवाद हाच प्रश्न सोडवण्याचा मार्ग आहे. रास्ता रोको, रेल रोको किंवा चक्काजाम अशा गोष्टींनी परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होईल.
शेतकऱ्यांच्या मदतीला सरकार प्राधान्य देत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत देणे ही आमची पहिली जबाबदारी आहे. आपण बँकांची नव्हे, तर थेट शेतकऱ्यांची मदत करणार आहोत,”असे ते म्हणाले. कर्जमाफीबाबतचा अंतिम निर्णय योग्य वेळी घेतला जाईल, असे सांगत फडणवीस यांनी शेतकऱ्यांना शांततेने आणि संयमाने वागण्याचे आवाहन केले. त्यांनी खात्री दिली की, “सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने उभे आहे आणि कोणत्याही न्याय्य मागणीकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. दरम्यान, नागपूरमध्ये आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.