लडाखबाबत भारत-चीन चर्चेला गती

29 Oct 2025 09:33:33
नवी दिल्ली,
india china भारत-चीन सीमेवरून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. चीनच्या संरक्षण मंत्रालयाने बुधवारी जाहीर केले की भारतासोबत सीमा विषयांवर झालेल्या चर्चेत लडाख प्रदेशातील व्यवस्थापन आणि नियंत्रण यावर विशेष भर देण्यात आला. चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की दोन्ही देशांनी चीन-भारत सीमेच्या पश्चिम भागातील परिस्थितीबाबत सक्रिय आणि सखोल चर्चा केली. या चर्चेचे प्रमुख उद्दिष्ट सीमावर्ती भागात शांतता आणि स्थैर्य राखणे हे होते.
 

भारत चीन  
 
 
२०२० मध्ये पूर्व लडाखमध्ये झालेल्या लष्करी संघर्षानंतर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देश प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर झालेली ही बैठक दोन्ही देशांमधील संवाद अधिक बळकट करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानली जात आहे. चीनच्या प्रवक्त्याच्या माहितीनुसार, भारत आणि चीन यांनी लष्करी व राजनैतिक माध्यमांतून संवाद आणि वाटाघाटी सुरू ठेवण्यास सहमती दर्शविली आहे. या उपक्रमामुळे सीमावर्ती भागात स्थिरता प्रस्थापित होण्यास आणि द्विपक्षीय संबंध सुधारण्यास मदत होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला.india china दरम्यान, भारताकडून या बैठकीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र तज्ञांचे म्हणणे आहे की, या चर्चेच्या परिणामी भारत-चीन संबंधांमध्ये सकारात्मक बदल घडू शकतो आणि प्रादेशिक स्थिरतेसाठी हा संवाद महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.
Powered By Sangraha 9.0