डीप टेक क्षेत्रात भारताची पुढील झेप निश्चित-पीयूष गोयल

29 Oct 2025 20:05:36
नवी दिल्ली,
India's leap in the deep tech sector केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी TiECon दिल्ली-एनसीआर 2025 च्या मुख्य सत्रात आपल्या काही महिन्यांपूर्वी केलेल्या वक्तव्याचे ठामपणे समर्थन केले. एप्रिल 2025 मध्ये झालेल्या “स्टार्टअप महाकुंभ” दरम्यान भारतीय स्टार्टअप्सवर केलेली त्यांची टीका विशेषतः फूड डिलिव्हरी आणि ऑनलाइन बेटिंग अॅप्सवर अत्यधिक लक्ष केंद्रित केल्याबाबत ही देशातील डीप टेक क्षेत्रासाठी एक “जागृतीची घंटा” ठरली, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
 

India 
गोयल म्हणाले की, त्यांच्या वक्तव्यावर आरंभी सोशल मीडियावर टीकेची झोड उठली होती, परंतु ती मुख्यतः “मोदी सरकारचे कायमस्वरूपी टीकाकार आणि नकारात्मकता पसरवणाऱ्या गटाकडून” आली होती. पुढे अनेक तरुण उद्योजकांनी त्यांच्या विचारांना समर्थन दिले, असे ते म्हणाले. त्यांनी उदाहरण म्हणून माजी इन्फोसिस संचालक मोहनदास पाई आणि जेप्टोचे संस्थापक यांचा उल्लेख केला. पाई यांनी या वक्तव्याला अयोग्य म्हटले असले, तरी जेप्टोच्या संस्थापकाची प्रतिक्रिया समजूतदार आणि संतुलित होती, असे गोयल यांनी सांगितले.
स्टार्टअप महाकुंभमध्ये गोयल यांनी भारतीय स्टार्टअप्सची तुलना चीनसह इतर देशांच्या स्टार्टअप्सशी केली होती. त्यांनी म्हटले होते की भारतात बहुतेक स्टार्टअप्स फूड डिलिव्हरीसारख्या वरवरच्या अॅप्सवर लक्ष केंद्रीत करत आहेत, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर मशीन लर्निंग, रोबोटिक्स आणि डीप टेक क्षेत्रात खऱ्या अर्थाने नवनवीन शोध होत आहेत. त्यांच्या या विधानावर स्टार्टअप जगतात तीव्र प्रतिक्रिया उमटली होती, अनेकांनी ते उद्योजकांना निरुत्साहित करणारे असल्याचे म्हटले होते.
TiECon परिषदेत बोलताना गोयल यांनी ‘डीप टेक’ ही केवळ एआय, क्वांटम कॉम्प्युटिंग किंवा मशीन लर्निंगपुरती मर्यादित संकल्पना नसल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, डीप टेक म्हणजे संरक्षण आणि अवकाश क्षेत्रातील तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर मिशन, नावीन्याची भावना आणि बौद्धिक संपदा निर्माण करणारे परिसंस्था या सर्वांचा एकत्रित संगम आहे. त्यांनी पुढे सांगितले की, मोदी सरकारच्या 11.5 वर्षांच्या काळात भारताने जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून स्थान मिळवले आहे. इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या २५ कोटींवरून १ अब्जांपर्यंत वाढली आहे, हे भारताच्या प्रगतीचे प्रतिक आहे. गोयल यांनी या परिषदेत आयोजकांचे आभार मानले आणि तरुणांमध्ये ‘डीप टेक’विषयीची आकांक्षा निर्माण केल्याबद्दल कौतुक केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, “भारतीय स्टार्टअप क्षेत्राची खरी ताकद ही फक्त ग्राहक अॅप्समध्ये नाही, तर नव्या पिढीतील तांत्रिक शोध, संशोधन आणि बौद्धिक नवोपक्रमांत आहे. याच दिशेने भारताची पुढील झेप निश्चित होईल.”
Powered By Sangraha 9.0