नागपूर,
Nagpur-RTO : दिवाळीच्या सुट्टीत नागपूरकरांच्या घरवापसीच्या उत्साहात काही खासगी प्रवासी वाहनचालकांनी प्रवाशांची चांगलीच लूट केली. नियमित भाड्याच्या दीड ते दुप्पट रक्कम आकारल्याचे अनेक तक्रारी आल्यानंतर, क्षेत्रीय परिवहन कार्यालयाने (आरटीओ) विशेष मोहीम राबवत अशा फसवणूक करणाऱ्या ऑपरेटरांवर कारवाई केली.
ही मोहीम दिनांक १७ ते २६ ऑक्टोबर दरम्यान नागपूर शहर व पूर्व विभाग आरटीओ कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आली. या काळात एकूण ३३३ खासगी बसांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी ८९ बसांमध्ये नियमभंग आढळला, अशी माहिती आरटीओ (शहर) किरण बिडकर यांनी दिली. ३२ बस ऑपरेटरांना प्रवाशांकडून जादा भाडे वसूल केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आणि मोटार वाहन अधिनियमान्वये १ लाख ७७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई आरटीओ बिडकर आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नागपूरमधील प्रमुख चेकपोस्ट, ट्रॅव्हल हब आणि प्रवासी प्रस्थान बिंदूंवर दोन मोबाइल पथके तैनात होती.
काही खासगी बस चालकांनी पुणे व हैदराबाद प्रवासासाठी ३ हजार ५०० रुपये ते १० हजार रुपये इतके अवाजवी दर आकारल्याचे उघड झाले. सरकारच्या २७ एप्रिल २०१८ च्या शासननिर्णयानुसार खासगी कंत्राटी बसांना एसटीच्या भाड्यापेक्षा जास्तीत जास्त ५०% अतिरिक्त शुल्क घेण्याचीच परवानगी आहे. यापेक्षा जास्त दर आकारल्यास परवाने निलंबित करण्याची कारवाई होऊ शकते. “सणासुदीच्या काळात प्रवाशांची फसवणूक सहन केली जाणार नाही. अशा सर्व नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील,” असा इशारा आरटीओ किरण बिडकर यांनी दिला. दिवाळीत घरी जाण्याच्या आनंदात प्रवाशांना लुटणाऱ्यांना यंदा ‘आरटीओचा दिवा’ चांगलाच पेटला आहे.