रेशनधारकांसाठी आनंदवार्ता...आता ‘प्रति कुटुंब नव्हे तर प्रति व्यक्ती’

29 Oct 2025 14:55:25
नवी दिल्ली,
Not per family, but per person केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना लाभार्थ्यांसाठी रेशन वितरणाच्या नियमांमध्ये ऐतिहासिक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना धान्याचे वाटप “प्रति कुटुंब” आधारावर केले जात होते, मात्र आता “प्रति व्यक्ती” आधारावर धान्य वाटप करण्याची नवी पद्धत लागू केली जाणार आहे.
 
 
Not per family, but per person
केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या अहवालानुसार, ही नवीन प्रणाली मार्च २०२६ पर्यंत पूर्णपणे अंमलात आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मंत्रालयाच्या 'कृती योजनेत' या बदलाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला असून, त्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे सध्याच्या पद्धतीमुळे निर्माण झालेली धान्य वितरणातील असमानता. अन्न मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, सध्या प्रति कुटुंब ३५ किलो धान्य दिले जाते, मग त्या कुटुंबात दोन सदस्य असोत किंवा सातपेक्षा जास्त. त्यामुळे काही लहान कुटुंबांना प्रमाणापेक्षा जास्त धान्य मिळते, तर मोठ्या कुटुंबांना अपुरे धान्य मिळते. ही विषमता दूर करण्यासाठी “प्रति व्यक्ती ७.५ किलो” धान्य वाटपाची योजना तयार करण्यात आली आहे.
 
या नव्या नियमानुसार, चार किंवा त्याहून कमी सदस्य असलेल्या कुटुंबांना सध्यापेक्षा कमी धान्य मिळेल, तर पाच किंवा अधिक सदस्य असलेल्या कुटुंबांना जास्त अन्नधान्य मिळण्याची शक्यता आहे. अन्न मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सध्या देशभरात १.७१ कोटी अंत्योदय कुटुंबे आहेत, त्यापैकी बहुसंख्य कुटुंबांमध्ये पाचपेक्षा कमी सदस्य आहेत. त्यामुळे या बदलामुळे केंद्र सरकारला धान्य वितरणातील लक्षणीय बचत होण्याची अपेक्षा आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सामान्य रेशनधारकांना दरमहा प्रति व्यक्ती ५ किलो धान्य दिले जाते. या पार्श्वभूमीवर अंत्योदय योजनेतील हा नवा बदल केवळ वितरण प्रणालीत सुधारणा करणार नाही, तर सरकारला अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम अन्नपुरवठा यंत्रणा निर्माण करण्यासही मदत करेल.
Powered By Sangraha 9.0