शिवांगी सिंगसोबत राष्ट्रपती मुर्मूंचा फोटो...पाकिस्तानचा खोटा दावा उघड

29 Oct 2025 16:44:54
अंबाला,
Pakistan's false claim about Shivangi Singh हरियाणातील अंबाला हवाई दल तळावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राफेल लढाऊ विमानातून उड्डाण केल्यानंतर पाकिस्तानचे सर्व दावे खोटे ठरले आहे. पाकिस्तानने काही दिवसांपूर्वी "ऑपरेशन सिंदूर" दरम्यान एका भारतीय महिला वैमानिकाला पकडल्याचा दावा केला होता. त्या वैमानिकाची ओळख स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग अशी सांगण्यात आली होती. मात्र, बुधवारी राष्ट्रपती मुर्मू यांनी राफेल उडवण्यापूर्वी याच शिवांगी सिंगसोबत घेतलेला फोटो समोर आला आणि पाकिस्तानचे खोटे उघडे पडले.
 

Pakistan 
 
या छायाचित्रात राष्ट्रपती मुर्मू हसतमुखाने शिवांगी सिंग यांच्यासोबत उभ्या असल्याचे दिसते. उड्डाणादरम्यान हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी दुसरे राफेल विमान उडवले. राष्ट्रपतींनी विशेष जी-सूट आणि हेल्मेट परिधान केले होते, जे उच्च वेग आणि जी-फोर्सपासून पायलटचे संरक्षण करते. सकाळी ११:२७ वाजता त्यांनी विमानातून हात हलवत उड्डाण केले आणि सुमारे ३० मिनिटांच्या उड्डाणानंतर सुरक्षित परतल्या. या उड्डाणादरम्यान राफेलने समुद्रसपाटीपासून सुमारे १५,००० फूट उंचीवर आणि ताशी ७०० किलोमीटर वेगाने प्रवास केला.
 
 
शिवांगी सिंग कोण आहेत?
वाराणसीतील एका साध्या कुटुंबातून आलेल्या शिवांगी सिंग यांनी लहानपणापासून मोठी स्वप्ने पाहिली. त्यांचे आजोबा भारतीय सैन्यात कर्नल होते, ज्यांच्याकडून त्यांना देशसेवेची प्रेरणा मिळाली. सेंट मेरी आणि सेंट जॉर्ज कॉन्व्हेंट स्कूलमधून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सनबीम महिला महाविद्यालयातून बी.एससी. पूर्ण केली. एनसीसीमध्ये सक्रिय सहभाग घेताना तिने २०१३ च्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये उत्तर प्रदेशाचे प्रतिनिधित्व केले.
शिवांगी या फक्त अभ्यासू नव्हत्या, तर क्रीडाक्षेत्रातही उत्तम होत्या. त्यांनी भालाफेकमध्ये राष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले आहे. एनसीसीमधून प्रेरणा घेतल्यानंतर त्यांनी २०१५ मध्ये भारतीय हवाई दलाची परीक्षा उत्तीर्ण केली आणि कठोर प्रशिक्षण घेतले. २०१७ मध्ये त्या भारताच्या पहिल्या पाच महिला फायटर पायलट्सपैकी एक बनल्या. प्रशिक्षणानंतर त्यांनी मिग-२१ लढाऊ विमान उडवले आणि राजस्थानमधील पाकिस्तान सीमेवरील तळावर सेवाही बजावली. येथेच त्यांची ओळख विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्याशी झाली. २०२० मध्ये फ्रान्सहून भारतात आलेल्या राफेल विमानांच्या पहिल्या तुकडीसोबत त्यांची गोल्डन अ‍ॅरोज स्क्वॉड्रन मध्ये नेमणूक झाली आणि त्या राफेल उडवणाऱ्या भारतातील पहिल्या महिला पायलट ठरल्या.
Powered By Sangraha 9.0