नागपूर,
People will decide - Bachchu Kadu महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात खळबळ उडवणाऱ्या सम्पूर्ण कर्जमुक्ती आंदोलनाने आज निर्णायक टप्पा गाठला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे प्रहार संघटनेचे नेते व आमदार बच्चू कडू यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानंतरही आपले आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने सायंकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलनाचे ठिकाण रिकामे करण्याचे आदेश दिले असले तरी, कडू यांनी ‘आंदोलन लोकांचे आहे आणि लोकच निर्णय घेतील’ अशी ठाम भूमिका घेतली आहे.
कडू म्हणाले, आम्ही न्यायालयाचा आदर करतो, परंतु न्यायालयाने आमची बाजू ऐकली नाही. प्रशासनात जर धमक असेल, तर आम्हाला अटक करून जेलमध्ये टाका. हे आंदोलन जनतेचे आहे. लोक म्हणाले तर आम्ही निघू, पण पोलिसांनी हटविल्यास पुन्हा दुपटीने येथे येऊ. त्यांनी प्रशासनाला दिलेले हे आव्हान आता मोठ्या चर्चेचा विषय ठरले आहे. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या या आंदोलनामुळे नागपूर शहरात वाहतूक व्यवस्थेचे पूर्णतः ठप्प चित्र दिसले. मंगळवारपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे शेकडो वाहने महामार्गावर अडकून पडली आहेत.
नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा आणि वर्धा या जिल्ह्यांतून आलेल्या शेतकऱ्यांनी सुमारे ५०० ट्रॅक्टर घेऊन रस्ते ठप्प केले आहेत. दरम्यान, काही आंदोलकांनी टायरची जाळपोळ करत निषेध नोंदविला, तर काहींनी पर्यायी मार्गांवरही वाहतूक रोखली. समृद्धी महामार्ग आणि रेल्वे मार्गावरही वाहतुकीचा अडथळा निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हायकोर्टाने या आंदोलनाची दखल घेत तातडीने सुनावणी केली आणि प्रशासनाला सायंकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलन स्थळ रिकामे करण्याचे आदेश दिले. न्यायालयाने पोलिसांना आदेशाच्या पालनाचा अहवाल गुरुवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आदेशाची प्रत बच्चू कडू यांना प्रत्यक्ष, ईमेल आणि व्हॉट्सअॅपवर पाठविण्यात आली आहे.
आता न्यायालयाच्या आदेशानंतर बच्चू कडू कोणती भूमिका घेतात, याकडे राज्याचे आणि संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. कारण त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की हे जनतेचे न्यायालय आहे, आणि मी त्याचा निर्णय पाळेन. या संघर्षमय वातावरणात शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीचे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात असून, पुढील काही तासांमध्ये परिस्थिती कोणत्या दिशेने वळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.