ग्रामविकासाच्या माध्यमातून शिक्षण, संस्कृती आणि श्रद्धेचा संगम : आ. डॉ. नरोटे

29 Oct 2025 17:11:53
गडचिरोली, 
Milind Narote : गावांचा सर्वांगीण विकास केवळ रस्ते, वीज आणि पाणीपुरवठा यापुरता मर्यादित नसतो. तो तेव्हाच घडतो, जेव्हा गावात ज्ञान, संस्कृती आणि श्रद्धेची ज्योत प्रज्वलित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहराप्रमाणेच शिक्षणाच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. आपण आपल्या मुलांना शिकवतो, मात्र त्यांच्या गावातच जर दर्जेदार वाचनालय उपलब्ध झाले, तर तोच विद्यार्थी स्वतःचे आणि गावाचे भविष्य घडवू शकतो. म्हणून अशा प्रकल्पांची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. मिलींद नरोटे यांनी केले.
 
 
HJH
 
आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा वार्षिक निधी योजनेअंतर्गत पोर्ला येथे भव्य व सुसज्ज वाचनालय बांधकामाचे भूमिपूजन आज पार पडले. विधिवत पूजन करून आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी कुदळ व टिकास मारून भूमिपूजन केले. यावेळी ते बोलत होते.
 
 
पुढे बोलताना आमदार डॉ. मिलिंद नरोटे म्हणाले की, या वाचनालयाच्या माध्यमातून गावातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे युवक तसेच वाचनाची आवड असलेले नागरिक यांना ज्ञानवृद्धीसाठी आणि अभ्यासासाठी एक उत्कृष्ट सुविधा उपलब्ध होणार आहे. ज्ञान हेच खरे बल या भावनेतून उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना प्रगतीचा नवा मार्ग दाखविणारा ठरणार आहे. या वाचनालयामुळे पोर्ला परिसरातील शैक्षणिक वातावरण अधिक समृद्ध व प्रेरणादायी होईल. गावातील विद्यार्थ्यांसाठी हे वाचनालय केवळ एक सुविधा नसून त्यांच्या स्वप्नांना आकार देणारे आणि ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणारे केंद्र ठरणार आहे. हे वाचनालय केवळ एक इमारत नाही, तर येथील प्रत्येक विद्यार्थ्याला नवी दिशा, आत्मविश्‍वास आणि प्रगतीचा मार्ग दाखविणारे ज्ञानकेंद्र ठरेल. ही सुविधा केवळ शासनाची किंवा आमदार निधीची नाही, तर संपूर्ण गावाची आहे. ती जपणे, वापरणे आणि पुढील पिढीपर्यंत तिचा फायदा पोहोचविणे ही खरी सर्वांची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.
 
 
 
याप्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, सरपंच निवृत्ता राऊत, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, अनिल म्हशाखेत्री, ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री रत्नदीप म्हशाखेत्री, भाजप तालुका महामंत्री लोमेश कोलते, उपसरपंच सुजित राऊत, ग्रामपंचायत सदस्य दिप्ती कोरडे, गुरुदेव निमगडे, सदस्य अजय चापले, अनिल चापले, रवींद्र सेलोटे, अभिजित कोरडे आदी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0