पाऊस, वादळाने शिरपूरच्या गरीब महिलेच्या घराचे मोठे नुकसान

29 Oct 2025 16:33:11
तभा वृत्तसेवा
आर्णी, 
Rain-Storm-Shirpur : शिरपूर येथे सोमवारी आलेल्या प्रचंड वादळ व पावसाने थैमान घातले होते. या वादळात शिरपूरच्या भाग्यश्री राठोड या महिलेचे घर जमीनदोस्त झाले. सुदैवाने या दुर्घटनेत जीवित हानी टळली असली तरी आर्थिक प्रचंड नुकसान झाले आहे.
 
 
y29Oct-Shirpur
 
 
सोमवारी पहाटेचा तो काळजाला चिरून जाणारा क्षण. आकाशात गडगडाट, विजांचा कडकडाट आणि अचानक आलेल्या वादळ व पावसाने शिरपूर गावात भीषण थैमान माजवले. या वादळाने गावातील भाग्यश्री राठोड या गरीब महिलेचं छोटंसं पण स्वप्नांनी भरलेलं घर क्षणार्धात जमिनदोस्त केलं. भाग्यश्रीचं घर म्हणजे तिच्या संसाराची आस होती. जिथं मुलगा आणि बहीण यांच्या सहवासात ती आयुष्य जगत होती. पण नियतीच्या या अचानक झटक्याने क्षणात सर्व काही उद्ध्वस्त झालं.
 
 
मात्र सुदैवाने, देवाच्या कृपेने कुटुंबातील सर्वजण वेळेत बाहेर पडले आणि अनर्थ टळला. तहसीलदार वैशाख वाहूरवाघ यांना माहिती मिळताच त्यांनी शिरपूर येथे जाऊन पाहणी केली व जेवढी होईल तेवढी शासकीय मदत मिळवून देईन, असे सांगितले.
 
 
वादळ शांत झाल्यावर गावकèयांनी पाहिलं ते दृश्य चिखल, ओलसर भिंती आणि भग्न स्वप्नांचं घर. पण त्याच क्षणी माणुसकीचा पाऊस कोसळला. गावकèयांनी एकदिलाने धाव घेतली, भाग्यश्रीला आधार दिला. जेवढं शक्य होईल तेवढा प्रत्येकाने मदतीचा हात पुढे केला.
 
 
काहींनी रोख मदत केली, काहींनी बांधकाम साहित्य दिलं, तर काहींनी हाताने काम करून आधार दिला. गावातल्या एकोप्याने पुन्हा सिद्ध केलं की आपत्ती कितीही मोठी असली तरी माणुसकीची ऊब तिच्यावर विजय मिळवू शकते.
Powered By Sangraha 9.0