बुलडाणा,
Sardar Vallabhbhai Patel Jayanti : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सरदार १५० एकता अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय पदयात्रा तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ‘माय भारत’ पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी पत्रकार परिषदेत केले.
जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल येथे दि. २९ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदे संपन्न झाली. या पत्रकार परिषदेत जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवे, एनएसएसचे पवन जगताप उपस्थित होते. युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय आणि ‘माय भारत’ यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित भारत पदयात्रा हा देशव्यापी उपक्रम राबविण्यात येत आहे. तरुणांमध्ये राष्ट्रीय भावना, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि एकतेचा संदेश पोहोचविणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. आजचा तरुण म्हणजे उद्याचा भारत या भावनेतून युवकांना राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा देण्यावर भर देण्यात आला आहे. या उपक्रमाशी संबंधित सर्व माहिती माय भारत पोर्टलवर उपलब्ध आहे.
केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मंडाविया यांच्या हस्ते ६ ऑटोबर २०२५ रोजी माय भारत पोर्टलद्वारे या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. मोहिमेत सोशल मीडिया रील स्पर्धा, निबंध लेखन आणि सरदार १५० यंग लीडर्स असे विविध कार्यक्रम होणार असून, या स्पर्धांतील १५० विजेत्यांना राष्ट्रीय पदयात्रेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. ३१ ऑटोंबर ते २५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत प्रत्येक जिल्ह्यात ८ ते १० किमी लांबीची पदयात्रा आयोजित केली जाणार आहे. या पदयात्रांचा उद्देश शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, पर्यावरण जागरूकता आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करणे आहे. या दरम्यान निबंध, वादविवाद, संवाद सत्रे, स्वच्छता मोहिमा आणि आरोग्य शिबिरे घेण्यात येतील. तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रमाणपत्र वितरण यांचेही आयोजन होईल.
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील मंत्री, खासदार, आमदार, स्थानिक प्रशासकीय अधिकारी, माय भारत आणि नेहरू युवा केंद्र संघटनाचे अधिकारी या पदयात्रांचे नेतृत्व करतील. २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान ५१२ किमी लांबीची ही पदयात्रा करमसदपासून गुजरातमधील केवडीया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत आयोजित केली जाणार आहे. या प्रवासादरम्यान विविध गावांमध्ये सामाजिक विकास कार्यक्रम, सांस्कृतिक उत्सव आणि सरदार पटेल यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शने सादर केली जातील. देशभरातील युवक संघटना, स्वयंसेवक, एनएसएस आणि एनसीसी सदस्य या मोहिमेत सहभागी होणार आहेत. सरदार पटेल यांच्या कार्यातून प्रेरणा घेत भारताच्या एकतेचा आणि स्वावलंबी भविष्यासाठीच्या संकल्पाचा संदेश या पदयात्रेतून दिला जाणार आहे