८० वर्षांचे गूढ उलगडलं सूर्याच्या तापमानामागचं रहस्य!

29 Oct 2025 15:46:17
हवाई, 
secret behind sun's temperature सूर्याच्या अतितप्त बाह्य स्तराचे रहस्य शास्त्रज्ञांनी अखेर उलगडले आहे. गेल्या आठ दशकांपासून सौर भौतिकशास्त्रज्ञांना गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. संशोधकांनी सूर्याच्या कोरोनामध्ये ‘टॉर्शनल अल्फवेन लाटा’ प्रत्यक्ष पाहण्यात यश मिळवले आहे. या लाटा सूर्याच्या वातावरणाला इतक गरम ठेवण्यामागचे एक महत्त्वाच कारण असल्याच स्पष्ट झाल आहे. ही अभूतपूर्व कामगिरी ‘नेचर अ‍ॅस्ट्रोनॉमी’ या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली असून, ती जगातील सर्वात शक्तिशाली सौर वेधशाळा हवाई येथील डॅनियल के. इनौये सोलर टेलिस्कोपच्या मदतीने साध्य करण्यात आली आहे. १९४२ साली नोबेल पारितोषिक विजेते हान्स अल्फवेन यांनी भाकीत केलेल्या या ‘अल्फवेन लाटा’ म्हणजे प्लाझ्मामधून प्रवास करणाऱ्या चुंबकीय कंपने आहेत. प्लाझ्मा हा सूर्याचा प्रमुख घटक असून तो विद्युत चार्ज असलेला वायू आहे. यापूर्वी मोठ्या प्रमाणावर दिसणाऱ्या अशा लाटा आढळल्या होत्या, परंतु पहिल्यांदाच इतक्या सूक्ष्म आणि सतत अस्तित्वात असलेल्या वक्र (टॉर्शनल) लाटा थेट पाहिल्या गेल्या आहेत.
 
 
secret behind sun
 
 
या संशोधनाचे नेतृत्व ब्रिटनमधील नॉर्थम्ब्रिया विद्यापीठाचे प्राध्यापक रिचर्ड मॉर्टन यांनी केले. त्यांनी सूर्याच्या कोरोनामधील लपलेल्या रोटेशनल गतींचा अभ्यास करण्यासाठी डॅनियल के. इनोये सौर दुर्बिणी वेधशाळेतील अत्याधुनिक क्रायोजेनिक निअर-इन्फ्रारेड स्पेक्ट्रोपोलारमीटर (क्रायो-एनआयआरएसपी) या उपकरणाचा वापर केला. या उपकरणाच्या मदतीने १.६ दशलक्ष अंश सेल्सिअस तापमानावर असलेल्या उच्च आयनीकृत लोहाचे निरीक्षण करण्यात आले. या निरीक्षणादरम्यान शास्त्रज्ञांनी चुंबकीय क्षेत्राच्या उलट दिशेने हालणाऱ्या वक्र लाटांमुळे निर्माण होणारे लहान, आवर्ती डॉपलर शिफ्ट (लाल आणि निळे बदल) नोंदवले. उपकरणाच्या अत्यंत संवेदनशीलतेमुळे इतक्या सूक्ष्म हालचाली टिपणे शक्य झाले. ब्रिटन, चीन, बेल्जियम आणि अमेरिकेतील वैज्ञानिकांच्या आंतरराष्ट्रीय पथकाने मिळवलेला हा शोध केवळ सौर विज्ञानातच नव्हे तर पृथ्वीवरील जीवनावरही परिणाम करणारा ठरणार आहे. या लाटांच्या अभ्यासामुळे भविष्यात येणाऱ्या सौर वादळांचा अचूक अंदाज घेणे शक्य होईल, ज्यामुळे उपग्रह, जिपीएस प्रणाली आणि वीजपुरवठा नेटवर्कचे रक्षण करता येईल. या शोधामुळे सूर्याच्या तीव्र तापमानाचं गूढ अखेर उलगडलं असून, सौर ऊर्जेच्या अभ्यासात हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे.
Powered By Sangraha 9.0