सिंधी बांधवांच्या हक्काच्या घराचा प्रश्न मिटणार...

29 Oct 2025 17:47:24
भंडारा,
Sunil Mendhe : विस्थापित सिंधी समाज बांधवांच्या गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या मागणीला घेऊन प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या असून या संदर्भात नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत एक बैठक घेतली गेली. माजी खासदार सुनील मेंढे यांनी या विषयाला घेऊन राज्याच्या महसूल मंत्र्यांना एक पत्र लिहिले होते, हे विशेष!
 

MENDHE  
 
पाकिस्तानातून विस्थापित झालेले अनेक सिंधी बांधव वेगवेगळ्या शहरांमध्ये वास्तव्यास आहेत. भंडारा शहरातील सिंधी कॉलनीतील सिंधी समाजाच्या जागेचा विषयही अनेक वर्षांपासून रेंगाळत आहे. त्यामुळे या समाज बांधवांना स्वतःच्या मालकीच्या घरात वास्तव करता येत नाही. या विषयावर यापूर्वी अनेक बैठका घेण्यात आल्या असल्या तरी ठोस समाधान निघाले नव्हते.
 
 
दरम्यान या विषयाला घेऊन माजी खासदार सुनील मेंढे यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांना पत्र लिहिले. हा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांना योग्य निर्देश देण्यात विनंती करण्यात आली होती. दरम्यान शासनाने विशेष पुढाकार घेत या विषयासंदर्भात एक नवीन व स्वतंत्र शासन निर्णय (जी.आर.) जाहीर केला आहे.
 
 
या जी.आर.च्या माध्यमातून राज्यभरातील अशा प्रकारच्या विस्थापित सिंधी समाजाला न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. याच परिपत्रकाच्या अनुषंगाने भंडारा जिल्हाधिकारी सावन कुमार आणि उपजिल्हाधिकारी डॉ. पूजा पाटील यांच्या उपस्थितीत सविस्तर बैठक घेण्यात आली. या बैठकीत समाजातील प्रतिनिधींनी आपले मुद्दे मांडले आणि शासन स्तरावरून या प्रलंबित विषयाला गती देण्याबाबत चर्चा झाली.
 
 
यामुळे आता सिंधी समाज बांधवांना न्याय मिळण्याची आशा बाळावली आहे. माजी खा. सुनील मेंढे यांच्या पुढाकारातून या विषयाला गती मिळाल्याने त्यांचे प्रयत्न सार्थकी लागले आहेत.
Powered By Sangraha 9.0