तभा वृत्तसेवा
राळेगाव,
Swapnil Papadkar : येथील स्वप्निल अशोक पापडकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सहायक आयुक्त समाजकल्याण वर्ग 1 अधिकारीपदी निवड झाली आहे. अत्यंत विषम परिस्थितीमधून मार्गक्रमण करत स्वबळावर ते या पदापर्यंत पोहचले आहेत.
कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि सातत्य असेल, तर व्यक्ती यशाचे शिखर गाठू शकतो, याचा प्रत्यय स्वप्निल पापडकर यांनी दिला. कोणतीही विशेष शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेल्या अगदी सामान्य कुटुंबातून आलेल्या स्वप्निलने हे यश संपादन केले आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राळेगाव येथेच झाले. त्यानंतर न्यू इंग्लिश हायस्कूल राळेगाव येथून 10 व 12 वी चांगल्या गुणांसह उत्तीर्ण केली.
यवतमाळ येथून डी.एड. चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी सूरू केली. त्यात त्यांनी यश मिळवून ते डाक विभागामध्ये डाक सहायक या पदावर 2010 मध्ये रूजू झाले. दरम्यान त्यांनी कला शाखेची पदवी मुक्त विदयापीठातून मिळविली. अमरावती विदयापीठातून राज्यशास्त्र या विषयामध्ये एम.ए. पदवी प्राप्त केली. समाजकार्य विषयातून (एमएसडब्ल्यु) पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. स्वप्निल यांची कृषी विभागामध्ये सहायक अधीक्षक पदावर 2014 मध्ये निवड झाली होती. त्यानंतर त्यांची सहायक लेखा अधिकारी या पदावर जिल्हा परिषद गोंदिया येथे नियुक्ती झाली. मात्र त्यापेक्षाही मोठे पद स्वप्निल यांना खुणावत होते.
नोकरी व कुटुंब सांभाळून त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरूच ठेवली. नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सहायक आयुक्त समाजकल्याण गट-अ पदाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली असून त्यामध्ये ते महाराष्ट्रातून 9 व्या क्रमांकासह उत्तीर्ण झाले आहे. त्यांच्या या यशामध्ये पत्नी नलिनी, मुलगी अदिवरा व आई-वडीलांनी भक्कम पाठिंबा दिला. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.